-->

मराठा आरक्षणासाठी उदयनराजे थेट “वर्षा’वर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी केली अर्धा तास चर्चा

सातारा – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर उदयनराजे यांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या “वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. मराठा आरक्षणासंदर्भात उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांसमोर पाच प्रश्न उपस्थित केल्याचे समजते.

एसईबीसी प्रवर्गातील उमेदवाराने ईडब्यूएस कोट्यातून आरक्षण स्वीकारल्यावर सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवर काही परिणाम होईल का? ईडब्यूएस आरक्षण मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्यास त्याचा या याचिकांवर काही परिणाम होईल का? ईडब्ल्यूएस आरक्षण रद्दबातल ठरवल्यास त्याचा मराठा समाजातील उमेदवारांवर काही परिणाम होईल का, असे प्रश्‍न उदयनराजेंनी उपस्थित केल्याचे समजते. सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यासंबंधी राज्याच्या मंत्रिमंडळ समितीने घेतलेले निर्णये समाजासमोर आले पाहिजेत.

त्यातून या खटल्यातील वकिलांना सरकारकडून नेमके काय निर्देश दिले गेले आहेत, याचा खुलासा होईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे निवड झालेल्या दोन हजार 150 मराठा उमेदवारांसाठी सुपर न्युमररी पोस्ट निर्माण करून त्यांना नोकरीत सामावून का घेत नाही, या प्रश्नावर उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे, असे वक्तव्य उदयनराजे यांनी मध्यंतरी केले होते.

राज्यातील वडीलधाऱ्या मंडळींनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले पाहिजे, असेही ते म्हटले होते. उदयनराजेंच्या वक्तव्याचा रोख शरद पवार यांच्याकडे होता. त्यानंतर उदयनराजेंनी शरद पवार यांची गेल्याच आठवड्यात भेट घेऊन त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढाकार घेण्याची विनंती केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.