सातारा – साताऱ्यात भाजपचे खासदार ‘उदयनराजे भोसलेंचा’ अंदाज नेहमी हटके असतो. ते कधी काय करतील याचा कोणालाच अंदाज लागत नाही. राजकीय परिणामांची भीती न बाळगता त्यांनी केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे यापूर्वी राज्यात धुरळा उडवून दिला होता. मजबूत शरीरयष्टी, भेदक नजर, तडकाफडकी जागेवर निकाल लावण्याच्या त्यांच्या वृत्तीचा साताऱ्यातच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रात बोलबाला असतो.
युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या उदयनराजेंनी उगारलेलं बोट, उडविलेली कॉलर, काय बाई सांगू कसं गं सांगू…. हे म्हणलेलं गाणं, त्यांची 007 क्रमांकाच्या जिप्सीचं नेहमी सर्वांना आकर्षण असतं. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा साताऱ्यात पाहायला मिळाला आहे.
नुकतंच उदयनराजे यांनी साताऱ्यातील राजलक्ष्मी थिएटरमध्ये आपल्या मित्रांसोबत जावून सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’चा बहुचर्चित ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट एन्जाॅय केलाय.
सध्या त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. थिएटरमध्ये जावून फिल्म पाहण्याची उदयनराजेंची ही पहिलीच वेळी नाहीय, तर याआधी देखील त्यांनी बरेच चित्रपट थिएटरमध्ये जावून पाहिले आहेत.
‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रुपेरी पडल्यावर प्रदर्शित झाला आहे. करोना काळात सुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करत बक्कळ कमाई केली आहे.
या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अभिनेता यशच्या ‘केजीएफ’लाही मागे टाकले आहे. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी अश्या तब्बल पाच भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.