सातारा – खासदार उदयनराजे भोसले उद्या शुक्रवारी दि. 19 रोजी दुपारी बारा वाजता कास जलाशयाच्या ओटी भरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून त्यानंतर कास- बामणोली रस्त्याच्या कामाची पाहणी करणार असल्याची माहिती सातारा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सभापती श्रीकांत आंबेकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मे महिन्यामध्ये कास जलाशयातील पाणीसाठा संपल्यामुळे सातारा शहरात पाणीकपात करण्याचे संकट आले होते, मात्र खासदार भोसले यांच्या सूचनेवरून शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी केली. पाणी कपातीचा दुर्दैवी निर्णय घेण्याची वेळ आली तरी सातारकरांनी मात्र आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत कोणतीही तक्रार केली नाही.
पावसाने ओढ दिल्यामुळे कोणत्याही क्षणी कास जलाशयातील पाणीसाठा संपेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र उशिरा का होईना कास जलाशय पाण्याने भरला आहे. त्याचे औचित्य साधून खासदारांसह नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांच्या हस्ते उपनगराध्यक्ष किशोर शिंदे, मुख्याधिकारी शंकरराव गोरे आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका यांच्या उपस्थितीत कास जलाशयाची ओटी भरण कार्यक्रम होणार आहे.