उदयनराजेंमुळे उरमोडीचे पाणी दुष्काळी भागात जाणार

संग्रहित छायाचित्र

पुसेसावळी, पारगांव, गोरेगाव, शेनवडी आदी गावांच्या पाण्यासाठी उद्यापासून उपाययोजना 
सातारा  – दुष्काळाचे भीषण सावट गडद होत असताना, उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारपदाच्या तिसऱ्या टर्मची सुरुवात आक्रमकपणे केली आहे. कार्यकर्त्यांनी लोकसा निवडणुकीचा विजयोत्सव साजरा करु नका, दुष्काळाच्या उपाययोजनांवर भर द्या, असे सांगत त्यांनी प्रत्यक्ष उपायांसाठी पाठपुरावा सुरू केला. जिल्हाधिकाऱ्यांशी दुरध्वनीवरुन तसेच उरमोडीचे कार्यकारी अभियंता जाधव यांच्यासमवेत चर्चा करुन खटाव तालुक्‍यातील म्हासुर्णे, पारगांव, येळीव तलावात उरमोडीचे पाणी सोडण्याविषयी सकारात्मक निर्णय करून घेतला.

सध्या म्हासुर्णे, पारगांव, येळीव तलाव कोरडे पडलेले आहेत. या तलावावर अवलंबून असलेल्या पाणी उपसा योजना पूर्णपणे पाणी नसल्याने कोलमडल्या आहेत. माणसांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मोठा झाला आहे. त्यामुळे पुसेसावळी, पारगांव, गोरेगांव, म्हासुर्णे, वडगांव, गाडेगांव, उंचीठाणे, शेनवडी आदी गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून, उरमोडीचे पाणी म्हासुर्णे, पारगांव, येळीव तलावात सोडण्यात यावे अशी आग्रही मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्याकडे केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी उरमोडीचे कार्यकारी अभियंता जाधव उपस्थित होते. लोकांना पिण्याचे पाणी नाही, उरमोडीतील पाणी तातडीने या तलावात सोडावे अशी मागणी देखील संबंधीत गावांतील ग्रामस्थांनी केली असून, अद्याप पाणी सोडण्यात आलेले नाही, त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला असून, त्याहून गंभीर जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे, याकरीता उरमोडीचे पाणी म्हासुर्णे, पारगांव, येळीव तलावात सोडण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

एकंदरीत भीषण दुष्काळ परिस्थिती, ग्रामस्थांची आणि खासदार उदयनराजे भोसले यांची मागणी याचा विचार करुन जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारपासून उरमोडीचे पाणी सोडण्याबाबतच्या सूचना कार्यकारी अभियंता जाधव यांना दिल्या. यावेळी स्वीय सहायक प्रताप शिंदे, पारगांवचे शिवाजीराव बाळा पवार, पुसेसावळीचे चंदकांत शंकरराव पाटील, गोरेगांव- वांगीचे बबनराव कदम, हिम्मतराव माने, वडगांव जयरामस्वामीचे संतोष घार्गे, रहाटणीचे ज्योतीराम (दादा) थोरात, शेनवडीचे चंद्रकांत पाटील, वांझोळीचे मगर आबा, म्हासुर्णेचे दिनकरराव माने, उंचीठाण्याचे शिवाजीराव शिंद, आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)