जनता अदालतमध्ये उदयनराजेंची फटकेबाजी

सातारा – शेती व पिण्याच्या पाण्यापासून काश्‍मीर प्रश्‍नापर्यंत तसेच सातारा जिल्ह्याचा विकास, अच्छे दिनची घोषणा आदींवर खासदार उदयनराजें भोसले यांनी आज चौफेर फटकेबाजी केली. अखेर सर्व आरोपांतून उदयनराजेंची निर्दोश मुक्तता करत त्यांना आणखी पाच वर्षे दिल्लीत खासदार या नात्याने प्रतिनिधित्व करण्यासाठी भावी वकिलांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. निमित्त होते ईस्माईल लॉ कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या जनता अदालत कार्यक्रमाचे.

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी आज या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर अभिमत न्यायालयाप्रमाणे रचना करण्यात आली होती. व्यासपीठासमोर एका बाजूच्या लाकडी पिंजऱ्यात पक्षकार उदयनराजे यांच्यासाठी खुर्ची ठेवण्यात आली होती. या पिंजऱ्यात बसूनच उदयनराजेंनी सर्व प्रश्‍नांना उत्तरे दिली.

सातारा जिल्ह्याचा सर्वांगिण विकास, वैयक्तिक आवडी निवडी, आदर्श व्यक्तिमत्व अशा विविध प्रश्‍नांची सरबत्ती करत लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खासदार उदयनराजेंना बोलतं केले. विविध प्रश्‍नांवर आपली बाजू थेट मांडताना उदयनराजे म्हणाले, “कच्चा माल उपलब्धता, विकसीत पायाभूत सुविधा यामुळे उद्योगांचा कल आधिपासूनच मुंबई, पुणे, ठाणे या महानगरांकडे होता. परंतु आता तेथील वाढीवर मर्यादा असल्याने हे उद्योग धंदे महामार्गालगतच्या शहरांकडे सरकू लागले आहेत. कास तलाव उंची वाढ, ग्रेड सेपरेटर आदी कामांमुळे साताऱ्यातही विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे.

निसर्ग व ऐतिहासिक पर्यटनासाठी जिल्ह्यात पोषक वातावरण आहे. त्यासाठीचे काही प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. आचारसंहिता संपल्यावर त्याला गती मिळेल. “जिवनात कोणाला आदर्श मानता या प्रश्‍नावर ते म्हणाले, “सर्व गुणांचा संचय असलेले एकच व्यक्तिमत्व या जगात आहे. आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज! शिवाजी महाराज हेच माझे आदर्श आहेत. सामान्यांच्या प्रश्‍नांप्रती असलेली तळमळ, राजा असूनही मनाचा मोकळेपणा, भावनेचा प्रामाणिकपणा उदयनराजे यांच्या मनोगतातून अधोरेखीत झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.