दोन्ही कंपन्यांमध्ये 2500 कोटींचा करार
नवी दिल्ली : फूड डिलिव्हरी ऍप झोमॅटोने उबर इट्सची खरेदी केली. तब्बल 2500 कोटी रुपयांना उबर इट्सची खरेदी करत झोमॅटोने हा व्यवहार केला असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्थात हा व्यवहार फक्त उबर इट्स या फूड डिलिव्हरी ऍप पुरताच मर्यादित असून उबरच्या कॅब सेवेशी याचा काही संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या व्यवहारानुसार उबर इट्सचे स्वतंत्र अस्तित्त्व संपुष्टात येणार आहे. त्याचबरोबर उबर इट्सला आपल्या सर्व ग्राहकांचा डेटा झोमॅटोकडे हस्तांतरित करावा लागणार आहे. उबर इट्सवरील ग्राहक झोमॅटोकडे वर्ग केले जातील. एका इंग्रजी वर्तमानपत्राने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
झोमॅटोचे संस्थापक दीपिंदर गोयल यांनी याविषयी माहिती दिली. उत्कृष्ट रेस्तरॉंची माहिती ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे आणि 500 हून अधिक शहरांमध्ये फूड डिलिव्हरीचे काम आम्ही करतो आहोत. आता उबर इट्स आमच्या ताब्यात आल्यामुळे या क्षेत्रातील आमचा दबदबा आणखी वाढला असल्याचे गोयल यांनी म्हटले आहे.
उबर इट्सकडे सध्या जे कर्मचारी आहेत, ते मात्र झोमॅटोकडे हस्तांतरित केले जाणार नाहीत. एकूण 100 कर्मचारी उबर इट्सकडे आहेत. यापैकी काही जणांना कामावरून काढून टाकले जाईल तर काही जणांना उबरच्या इतर सेवांमध्ये सामावून घेतले जाणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.