उडता पंजाब! (भाग-१)

व्ही. के. कौर

एकेकाळी दहशतवाद्यांच्या विळख्यात अडकलेल्या पंजाबमध्ये आता नवीन समस्या उग्र रुप धारण करत आहे. अंमली पदार्थांच्या बेसुमार वापरामुळे पंजाबची प्रतिमा बदलत आहे. पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे महिनाभरात 46 जणांचा मृत्यू झाला आहे. 2010 पासून ते 2015 या कालावधीत अंमली पदार्थांच्या सेवनामुळे पंजाबमध्ये सुमारे 413 जणांचा मृत्यू झाला आहे. अन्नधान्यांने समृद्ध असलेला आणि वीरांची भूमी असलेल्या भूमीत आता अफूं, गांजा याचा धूर निघत आहे. अर्थात पंजाबच्या सर्वच भागात ही स्थिती नसली तरी वेळीच पायबंद घातला नाही तर पंजाबचा चेहरा-मोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. 

पंजाबमध्ये अंमली पदार्थाच्या सेवनामुळे महिनाभरात 46 जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये अंमली पदार्थाचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अमरिंदर सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना डोप टेस्ट करणे आणि डॉक्‍टराचे प्रिस्क्रिप्शन असल्याशिवाय इंजेक्‍शनची सिरिंज न देण्याची व्यवस्था केली आहे. मात्र सध्याची स्थिती पाहता हे उपाय खुपच थिटे पडत आहेत. सरकारला एक निश्‍चित आणि ठोस निर्णय घेण्याची गरज आहे अंमली पदार्थांच्या माफियांना वेसण घालण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्‍यकता आहे. सरकारकडून जोरदार मोहिम सुरू झाल्यास आणि अंमली पदार्थांच्या तस्करांची चोहोबाजूंनी कोंडी केल्यास पंजाबचे नागरिक स्वत: सावरतील.
आकडेवारीवरून पंजाबमधील 50 टक्के युवक नशेच्या आहारी गेल्याचे निदर्शनास येते. युवकाशिवाय मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला देखील नशा करत आहेत. जर अंमली पदार्थ मिळत नसेल तर लहान मुले मेडिकल स्टोअर्समध्ये जावून कफ सिरिप खरेदी करताना दिसतात. पंजाबमध्ये अंमली पदार्थाच्या बाजारात अब्जावधी रुपयांची उलाढाल आहे. या कारणामुळेच पंजाब सरकार अंमलीपदार्थावरील नियंत्रणाबाबत मोठ्या प्रमाणात दावे करत असले तरी अंमली पदार्थाचा बाजार आणि त्याचे सेवनाचे प्रमाण वाढतच चालले आहे. गेल्या दहा वर्षात अंमली पदार्थामुळे देशभरात 25 हजार 426 जणांनी आत्महत्या केली. यानुसार अंमली पदार्थाच्या सेवनामुळे दररोज सात जण आत्महत्या करत असल्याचे आकडेवारीवरून कळते.
विशेष म्हणजे अंमली पदार्थाच्या सेवनामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण गेल्या दहा वर्षात 149 टक्‍क्‍यांनी वाढले आहे. पंजाबचे युवक अंमली पदार्थाच्या आहारी कसे गेले, याचे वास्तव दाखवणारा “उडता पंजाब’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात अंमली पदार्थाचा बाजार करणारे व्यापारी, पोलिस, प्रशासनाची मिलीभगत, राजकीय आश्रय याचे दर्शन आपल्याला घडले. पंजाबमध्ये अफू, ड्रग्जची खुलेआम विक्री होते. पकडल्यास लाच देऊन ही मंडळी आरामात बाहेर येतात.
अंमली पदार्थाच्या तस्करीत नेते आणि त्यांचे नातेवाईक यांचा सहभाग आहे. नेत्यांनी व्होटबॅंक वाढवण्यासाठी अंमली पदार्थाचा वापर केल्याचेही आढळून आले आहे. यावरून पंजाबमध्ये अंमलीपदार्थाचे प्रमाण वाढण्यास एकच कारण नसल्याचे लक्षात येते. झटपट आणि कमी श्रमात पैसे कमावणे, वाढती बेरोजगारी, पाकिस्तानातून होणारी बेकायदा आयात आदी कारणांमुळे अंमली पदार्थांचा उद्रेक पंजाबमध्ये झाला आहे.
33 दिवसात 46 जणांचा मृत्यू झाल्यानंतर अमरिंदर सरकार खडबडून जागे झाले. वृत्तपत्रातील बातम्यानुसार अंमली पदार्थ मिळत नसल्याने नागरिकांचा मृत्यू होत आहे. अंमली पदार्थ न मिळाल्यास युवा मंडळी ही गुंगी आणणारे अल्कोहोलयुक्त औषधांचे मिश्रण करून त्याचे सेवन करत आहेत. त्याचा ओव्हरडोस झाल्यास प्रसंगी मृत्यू देखील ओढवू शकतो. सरकारी कर्मचारी देखील नशेच्या आहारी गेल्याचे सांगितले जात आहे. म्हणूनच पंजाब सरकार पाच लाख कर्मचाऱ्यांची डोप टेस्ट करू इच्छित आहे. यात पोलिस, प्रशासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची डोप टेस्ट ही नियुक्ती, वार्षिक मूल्यांकन आणि पदोन्नतीच्या वेळेस करण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. आतापर्यंत खेळाडूंची डोप टेस्ट होत असे. आता अंमली पदार्थाचे वाढते प्रस्थ पाहता कर्मचाऱ्यांवरही करण्याची वेळ आली आहे. जगभरात डोप टेस्टचे तीन डझनभर केंद्र आहेत. असे असले तरी मोठ्या संख्येने असलेल्या कर्मचाऱ्यांची डोप टेस्ट करणे सरकारसाठी सोपी बाब नाही. 2016 मध्ये अकाली-भाजप सरकारने देखील भरतीच्या वेळेस 7200 पोलिस शिपायांची डोप टेस्ट केली होती.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)