उडता पंजाब! (भाग-२)

व्ही. के. कौर 
एकेकाळी दहशतवाद्यांच्या विळख्यात अडकलेल्या पंजाबमध्ये आता नवीन समस्या उग्र रुप धारण करत आहे. अंमली पदार्थांच्या बेसुमार वापरामुळे पंजाबची प्रतिमा बदलत आहे. पंजाबमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनामुळे महिनाभरात 46 जणांचा मृत्यू झाला आहे. 2010 पासून ते 2015 या कालावधीत अंमली पदार्थांच्या सेवनामुळे पंजाबमध्ये सुमारे 413 जणांचा मृत्यू झाला आहे. अन्नधान्यांने समृद्ध असलेला आणि वीरांची भूमी असलेल्या भूमीत आता अफूं, गांजा याचा धूर निघत आहे. अर्थात पंजाबच्या सर्वच भागात ही स्थिती नसली तरी वेळीच पायबंद घातला नाही तर पंजाबचा चेहरा-मोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. 
पंजाबमध्ये अमली पदार्थांची ही वाढती तलफ पाहता आपल्याला अंमली पदार्थाचा बाजार आणि इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अफू आणि त्याचे सह उत्पादने ही पंजाबातील अंमली पदार्थाचे मुख्य स्त्रोत आहेत. मात्र अशी स्थिती पूर्वी नव्हती. अफूच्या सेवनाचा मोठा इतिहास आहे.
प्राचीन काळात मध्य-पूर्व आणि मध्यकाळात दक्षिण आशियात सर्वसामान्य नागरिकांत अंमली पदार्थाचे सेवन होत असे. त्याचा वापर हा दुखण्यांवरील उपचार म्हणून किंवा लैगिंक शक्ती वाढवण्यासाठी औषध म्हणून केला जात असे. तत्कालिन काळात नागरिक कधीही अशा प्रकारच्या अंमली पदार्थाच्या आहारी गेले नाहीत. ही पद्धत 18 व्या शतकांपर्यंत सुरू होती. मात्र 19 व्या शतकात अफूचे उत्पादन करणारे कारखाने आपल्याकडे सुरू झाले.
तत्कालिन काळात औषधी कंपन्या बेअर एजी, पार्के डेव्हिस आणि व्हिन्सलो कर्टिस अँड पर्किस आदींनी अफूसारख्या अंमली पदार्थाच्या बाजाराचे चांगले आकलन केले होते. या कंपन्यांनी तातडीने अफूबरोबरच मॉर्फिन, हेराईनसारख्या सह उत्पादनाची निर्मिती सुरू केली आणि त्याला औषधाप्रमाणे बाजारात विक्री केली. हे पदार्थ अफूपेक्षाही घातक होते. या कंपन्यांनी अगदी औषधाप्रमाणे बाजारात आणले. बेअर्सचे हेरॉईन आणि मिस विन्सलोचे सीरप हे खोकला दूर करण्यासाठी आणि मुलांमधील चिडचिडेपणा कमी करण्यासाठी वापरले जावू लागले.
अफूपासून तयार केलेले अंमली औषधांचे उत्पादन आणि विक्री ही दक्षिण आशियातील युरोपातील भांडवलदारांच्या गुंतवणुकीची सुरवात होती. इस्ट इंडिया कंपनीने तत्कालिन काळात बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये उच्च गुणवत्तेच्या अफूची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू केली. कमी खर्चात अफूचे उत्पादन घेता येत असल्याने कारखानदारांना हा व्यवसाय फायदेशीर राहिला. नागरिकही अफूच्या आहारी गेल्याने दिवसेंदिवस अफूची मागणी होऊ लागली. इंग्रजांसाठी अफूपासून दोन फायदे होते.
पहिले म्हणजे चीनमधून हजारो टन चहाची आयात करावी लागत होती आणि त्याबदल्यात चांदी द्यावी लागत होती. त्यामुळे चीनला बराच आर्थिक फटका सहन करावा लागत होता. मात्र इंग्रजांनी चीनला चहाच्या बदल्यात अफू देण्यास सुरवात केली. तत्कालिन काळात चीनमध्ये अफूला प्रचंड मागणी होती. इंग्रजांनी पाटण्यात अफूच्या मोठमोठ्या फॅक्‍टरी उभारल्या. हा माल गंगा नदीच्या माध्यमातून कोलकत्ता येथे पाठवला जात असते. तेथून अफूचा माल चीनला निर्यात केली जात असे.
1912 मध्ये अफूचे उत्पादन आणि बाजाराला नियंत्रित करण्यासाठी युरोप-चीन-जपानमध्ये करार करण्यात आला. नेदरलॅंडची राजधानी हेग येथे देखील करार करण्यात आला. त्यात अफूला बेकायदेशीर उत्पादन ठरवून त्याचे सह उत्पादन मॉर्फिन, हेरॉईन, कोकेनसारख्या सेवनावर बंदी घालण्यासंदर्भात पहिला आंतरराष्ट्रीय करार करण्यात आला. या उत्पादनावर बंदी घालण्याबरोबरच अफूचा व्यवसाय हा फायद्याचा सौदा ठरू लागला. या व्यवसायाशी निगडीत असलेले नागरिक छुप्या मार्गाने त्याचा व्यवहार करू लागले आणि ते फायद्याचेही ठरू लागले.
आज आशिया खंडात अफूचा बेकायदेशीर बाजार हा दोन क्षेत्रात सर्वाधिक होत आहे. त्यात गोल्डन ट्रॅंगलच्या माध्यमातून म्यानमार, लाओस, दक्षिण चीनचा समावेश होतो तर दुसरा गोल्डन क्रिसेंट त्यातंर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण आणि मध्य आशियातील देश येतात. या देशांशी पंजाबची असलेली भौगिलिक जवळीकता ही सर्वात मोठी समस्या आहे. याशिवाय येथील सरकारची भूमिका ही काहीप्रमाणात इंग्रजांप्रमाणेच आहे. सरकारला देखील अफू आणि अंमली पदार्थाच्या बाजारापासून फायदा होतो. यामागचे आणखी एक मोठे कारण म्हणजे भांडवलशाही.
पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा काहीच करत नाही, अशातला भाग नाही, मात्र त्यांचे प्रयत्न खूपच अपुरे पडत आहेत. दरवर्षी हजारो, कोट्यवधींच्या ड्रग्जचा साठा पकडला जात आहे. 2011 ते 2014 या काळात पंजाबमध्ये 380 लाख किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. अंमलीपदार्थावर निर्बंध आणण्यासाठी पंजाबमध्ये नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सब्सटेंन्स ऍक्‍ट 1985 तयार करण्यात आला. हा कायदा एनडीपीएस ऍक्‍ट म्हणून ओळखला जातो.
पंजाबमध्ये जेवढे कैदी आहेत, त्यापैकी 41 टक्‍क्‍याहून अधिक नागरिक एनडीपीएस ऍक्‍टप्रमाणे तुरुंगात आहेत. राज्यातील नशेचे वाढते जाळे तोडणे सरकारसाठी आव्हानात्मक आहे. मात्र सरकारला हे कठिण आव्हान स्वीकारावे लागेल आणि ते यशस्वीपणे पारही करावे लागेल.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)