फिलिपाईन्सचा चीनला झटका

अमेरिकेबरोबर लष्करी सराव करण्याच्या करारास मंजुरी

मनीला  – दक्षिण चीन समुद्रावर वर्चस्व निर्माण करू पाहत असलेल्या चीनला फिलिपाईन्सने मोठा झटका दिला आहे. फिलिपाईन्सचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी अमेरिकन सैन्यांबरोबर सर्वसमावेशक लष्करी सराव करार करण्यास मंजुरी दर्शविली आहे. हा निर्णय दोन्ही देशांच्या संरक्षण मंत्र्यांनी आज जाहीर केला आहे.

यापूर्वी राष्ट्रपती दुतेर्ते यांनी हा करार रद्द केला होता. ज्यामुळे दोन्ही देशांमधील चिंता वाढली होती. इतकेच नव्हे, तर अमेरिकेच्या सैन्यदलाबरोबरचा करार रद्द करण्यासाठी चीनने फिलिपाईन्सला करोना लसीसह अनेक प्रकारची प्रलोभने दिली होती.

या कराराअंतर्गत अमेरिका आणि फिलिपिन्स सैन्य दलांमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव आयोजित केले जातात. या निर्णयाची घोषणा संरक्षण मंत्री डेल्फीन लॉरेन्झानाने अमेरिकन समकक्ष अधिकारी लॉयड ऑस्टिन यांच्या उपस्थितीत केली.

डेल्फीन लॉरेन्झाना म्हणाले, देशाचे राष्ट्रपती रॉड्रिगो दुतेर्ते यांनी यापूर्वी करार संपुष्टात आणण्याचा निर्णय रद्‌द केला आहे. या निर्णयाचे अमेरिकेकडूनही स्वागत करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अमेरिका-फिलिपाईन्स यांच्यातील सुरक्षा संबंध आणखीन मजबुत होण्यास मदत होईल.

दरम्यान, या निर्णयामुळे दक्षिण चीन समुद्राच्या विस्तीर्ण क्षेत्रावर दावा करणाऱ्या चीनला मोठा हादरा बसल्याचे मानले जात आहे. तसेच दक्षिण चीन समुद्रात चीनला पुन्हा अमेरिकेच्या शरण जाण्यास भाग पाडले गेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.