आपल्या प्रेयसी अथवा प्रियकराला लग्नासाठी मागणी घालणं ही प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक प्रेशियस मोमेन्ट असते. आयुष्यात एकदाच येणाऱ्या अशा या ‘स्पेशल’ क्षणाला काहीलोक अधिकाधिक स्पेशल बनविण्यासाठी काहीतरी हटके करत असतात. अशीच एक घटना बोस्टन येथे घडली असून येथील ली नावाच्या एका प्रियकराने आपल्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी चक्क ‘ऍनिमेटेड सिनेमाचं’ रचला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बोस्टन येथील रहिवाशी असलेला ली लोचलर आपली प्रेयसी स्थुथी डेव्हिड हिला ३० डिसेंबरच्या रात्री चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने बोस्टन येथील एका चित्रपटगृहामध्ये घेऊन गेला. स्थुथीला चित्रपटगृहामध्ये आपल्याला आयुष्यातलं सर्वात मोठं सरप्राईझ मिळणार असल्याची कोणतीच कल्पना नव्हती.
चित्रपटगृहामध्ये ‘स्लीपिंग ब्युटी’ हा डिझनीचा ऍनिमेटेड चित्रपट सुरु झाल्यानंतर चित्रपटातील नायक नायिकेला ‘प्रपोज’ करण्यासाठी गेल्याचं चित्र पडद्यावर दिसतं. मात्र चित्रपटातील नायक आपला प्रियकर ली याच्यासारखा तर नायिका आपल्या सारखी दिसत असल्याचे पाहून स्थुथीला आश्चर्याचा धक्काच बसतो. पुढच्याच क्षणी स्थुथीचा प्रियकर ली तिला प्रपोज करण्यासाठी तिच्यासमोर रिंग घेऊन उभा राहतो. आश्चर्याचे एकापाठोपाठ एक धक्के बसलेली स्थुथी देखील आनंदाने भरलेल्या नयनांसह त्याचा प्रपोज स्वीकारते.
दरम्यान, लीने हे सर्व क्षण टिपून ठेवण्यासाठी चित्रपटगृहामध्ये छुपे कॅमेरे लावलेले असल्याने हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून स्थुथीच्या चेहऱ्यावरील हावभाव नक्कीच पाहण्यासारखे आहेत. इंटरनेटवर हा व्हिडीओ सध्या धुमाकूळ घालत असून आतापर्यंत हा व्हिडिओ ६ मिलियन पेक्षा अधिक लोकांनी पहिला आहे.