टोकियो – जपानमध्ये मवार वादळामुळे गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असून अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे अनेक भागातील वीज पुरवठा देखील खंडीत झाला असून बुलेट ट्रेन देखील थांबवावी लागली आहे.
मवार चक्रिवादळ जपानच्या जवळ येऊ लागल्यामुळे अतिवृष्टी आणि सोसाट्याच्या वाऱ्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने सुमारे 10 लाख नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची तयारी सुरू केली आहे.
देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवाही स्थगित करण्यात आली आहे. शुक्रवारी 300 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तर जलमार्गावरील 52 बोटींच्या फेऱ्याही रद्द कराव्या लागल्या होत्या. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील विस्कळीत झाली आहे, असे परिवहन मंत्रांच्या सूत्राने स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.
सुमारे 9 हजार घरांचा वीज पुरवठीा खंडीत झाल्याचे वृत्त आहे. टोकियो पासून पश्चिम जपानमधील ओसाका दरम्यान बुलेट ट्रेनचा प्रवास देखील स्थगित करण्यात आला आहे. देशातील अन्य भागातील बुलेट ट्रेनच्या प्रवासावरही मर्यादा आल्या आहेत.
पश्चिम जपानमधील कोची, वाकायामा आणि नारा भागांमध्ये आणखीन पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर ताकाई आणि कांतो-काशीन या भागांमध्ये गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.