पाचगणी – महाबळेश्वर शहरापासून अंदाजे एक किमी अंतरावर महाड रस्त्यावर हॉटेल अप्सरा ते महाड नाका परिसरातील अवघड वळणावर तीन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोन युवक जागीच ठार झाले, तर दोन युवक जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात रविवारी रात्री 12 च्या सुमारास झाला.
याबाबत माहिती अशी, महाबळेश्वरकडून महाडच्या दिशेने हिरो डिलक्स (एमएच-13-सीआर-7193) मोटारसायकल विरुद्ध बाजूने भरधाव निघाली होती. या मोटारसायकलने समोरून येणाऱ्या हिरो स्प्लेंडर (एमएच-12-सीडब्यू-2767) व हिरो पॅशन एक्स-प्रो 110 (एमएच-11-सीआर-3744) या मोटारसायकलींशी धडक झाली. या भीषण अपघातात जुबेर मुस्तफा मानकर (रा. नगरपालिका सोसायटी, महाबळेश्वर), आकाश तानाजी भोसले (रा. मंगळवेढा, ता. पंढरपूर) या युवकांचा जागीच मृत्यू झाला.
अमीन बिस्मिल्ला शेख (रा. महाबळेश्वर) व दरिबा सुनील बळवंतराय उर्फ गोट्या (रा. मंगळवेढा) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर महाबळेश्वरातील बेल एअर संचलित ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघाताची खबर रमीझ खाजा वारुणकर (रा. महाबळेश्वर) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी हिरो डिलक्स मोटारसायकलचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक संदीप भागवत तपास करत आहेत.