पुणे – टेलिग्रामवर वेगवेगळे टास्क पूर्ण करुन “वर्क फ्रॉम होम’च्या माध्यमातून जादा पैसे कमविण्याचे आमिष दोघा आयटीतील तरुणांना भलतेच महागात पडले. या दोघांच्याही बॅंक खात्यातून भामट्यांनी तब्बल 50 लाख रुपये काढून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर भामट्यांनी व्हॉटसअ्प आणि टेलिग्रामवरुन विकी गाधे शाम (वय 27, रा. साईनगरी, चंदननगर) याच्याशी संपर्क साधला होता, त्याला टेलिग्राम आयडी जॉइन करण्यास सांगितले. यानंतर वेगवेगळे टास्क देऊन त्या बदल्यात पैसे देण्याचे आमिष दाखवले. मात्र त्याला टास्कच्या बदल्यात कोणतेही पैसे न देता, त्याच्या बॅंक खात्यातील तब्बल 24 लाख 95 हजाराची रक्कम सायबर भामट्यांनी लाटली. अशाच प्रकारे आशिष मुकेश जैन (वय 33, रा.खराडी) यालाही वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देऊन पैसे देण्याचे आमिष दाखवले. मात्र, त्याच्या खात्यातून 24 लाख 93 हजार रुपये वर्ग करुन घेतले. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे करत आहेत.
सायबर सेलकडे सध्या टास्क फ्रॉडच्या केसेस दाखल होत आहेत. सायबर भामटे दरवेळी वेगवेगळी मोडस अवलंबत असतात. सेक्सटॉर्शन, महावितरण, विमा फ्रॉडनंतर आता टास्क फ्रॉडकडे ते वळले आहेत. यामध्ये जास्तीत जास्त करुन आयटीतील कर्मचारी फसत आहेत.
– मीनल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन