- गुन्हे शाखेने युनिट 1 ने आवळल्या मुसक्या
- चोरट्यांकडून दहा दुचाकी हस्तगत
पिंपरी – मौजमजेसाठी वाहन चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत केल्या. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ही कामगिरी केली.
स्वप्नील राजू काटकर (वय 19, रा. दिघीरोड, आदर्शनगर, भोसरी) आणि राहूल मोहन पवार (वय 19, रा. मधुबन सोसायटी, चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे कर्मचारी गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी गणेश सावंत व नितिन खेसे यांना माहिती मिळाली की दोघेजण भोसरी येथील पुलाखाली दुचाकीसह संशयितरित्या उभे आहेत. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून दोघांना अटक केली.
त्यांच्याकडे असलेल्या दुचाकींबाबत विचारणा केली असता त्यांनी सुरवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात आणून विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी दोन्ही दुचाकी चोरीच्या असल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी आणखी आठ दुचाकी चोरल्याचेही सांगितले. त्यानुसार पोलिसांच्या त्यांच्याकडून दहा दुचाकी हस्तगत केल्या. यापैकी आठ दुचाकी चोरीचे गुन्हे सांगवी, भोसरी, एमआयडीसी भोसरी आणि खडकी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. उर्वरित एका वाहन मालकाने आपल्याला गुन्हा दाखल करायचा नाही, असे सांगितले. तर एक दुचाकी आरोपींनी संगमनेर येथून चोरली असून याबाबतचा तपास सुरू आहे.
आरोपी चोरलेल्या दुचाकी दिवसभर फिरवायचे आणि रात्रीच्यावेळी ते भोसरी येथील पुलाखाली पार्किंगमध्ये लावत असे. तर काही दुचाकींची त्यांनी ओळखीच्या व्यक्तींना कागदपत्र नंतर देतो, असे सांगून विक्री केली होती.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस कर्मचारी रवींद्र गावडे, सचिन उगले, गणेश सावंत, विजय मोरे, विशाल भोईर, नितीन खेसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.