– रियाज इनामदार
सौदी अरेबियात महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले आहे. महिलांसाठी कडक धोरण असणारा देश म्हणून असलेल्या प्रतिमेतून सौदी बाहेर पडू इच्छित आहे.
गेल्या काही वर्षांत सौदी अरेबियामध्ये मोठ्या वेगाने बदल घडून आले असून, अजूनही बदल घडत आहेत. तेथून दररोज चकित करणाऱ्या बातम्या ऐकायला मिळू लागल्या आहेत आणि त्या सर्व बातम्या महिलांशी संबंधित आहेत. तसे पाहायला गेल्यास सौदी अरेबियाची प्रतिमा जगातील एक कट्टरपंथी देश अशीच आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून तेथील सरकारने महिलांना एकेका बंधनातून मुक्त केले आहे. सौदीचे राजपुत्र मोहंमद सलमान हे जगाच्या नजरेत सौदीची प्रतिमा बदलू इच्छित आहेत.
ताजी बातमी अशी की, सौदी अरेबियात महिलांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या दोन कार्यकर्त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले आहे. सौदीचे प्रिन्स मोहंमद सलमान यांच्या आदेशावरून त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी अधिक स्वातंत्र्याची मागणी करून शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या या महिलांविरुद्ध व्यापक कारवाई करण्यात आली होती. समर बादानी आणि नसीमा अल सदा यांच्यासमवेत 2018 मध्ये झालेल्या कारवाईत ज्यांना ताब्यात घेण्यात आले, त्या सर्वच महिला कार्यकर्त्यांना तुरुंगातून मुक्त करण्यात आले आहे, असे समजते.
ह्यूमन राइट्स वॉचनेही या सुटकेच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. या सर्व महिलांना पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा फर्मावण्यात आली होती. त्यातील दोन वर्षांची शिक्षा माफ करण्यात आली आहे. या महिलांनी सौदीतील पुरुष संरक्षण कायद्यांवर उघडपणे टीका केली होती. या कायद्यांमध्ये महिलेच्या पतीला, पित्याला आणि काही बाबतीत मुलाला असा अधिकार दिला होता, की ते महिलांकडून त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेऊ शकतात आणि त्यांच्या प्रवासावर निर्बंध घालू शकतात.
या महिला कार्यकर्त्यांनी महिलांना मोटार चालविण्याचा अधिकार मिळण्याचीही मागणी केली होती. अर्थात, या दोन्ही महिला कार्यकर्त्यांची सशर्त सुटका झाली असून, पाच वर्षांपर्यंत त्या परदेशी जाऊ शकणार नाहीत. तुरुंगातून मुक्त झालेल्या अन्य महिला अधिकार कार्यकर्त्यांप्रमाणेच याही दोघींना माध्यमांशी बोलण्यास आणि आपल्यावरील आरोपांबाबत कोणतीही ऑनलाइन पोस्ट करण्यास मज्जाव करण्यात येऊ शकतो. यापूर्वी सुमारे बारा महिलांनी सौदीतील न्यायाधीशांना असे सांगितले होते की, तुरुंगात चेहरे झाकलेल्या पुरुषांनी त्यांच्या पाठीवर आणि मांड्यांवर काठीने मारहाण केली होती. त्याचप्रमाणे पाण्यात उभे करून त्यांना यातना दिल्या होत्या. या बातम्यामुळे सौदीचे राजपुत्र खूपच चिंतेत होते. आता त्या देशात महिलांना मोटार चालविण्याचा अधिकार देण्यात आला आहे आणि महिलांवर नियंत्रण ठेवण्याचे पुरुषांचे अधिकारही सीमित करण्यात आले आहेत. त्यामुळे महिला कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवण्यात काहीच औचित्य नव्हते.
सन 2015 मध्ये सौदी अरेबियातील महिलांना प्रथमच मतदान करण्याचा आणि शहरांमधील पालिकांच्या निवडणुका लढविण्याचा अधिकार देण्यात आला होता. 2017 मध्ये सौदी अरेबियातील महिलांना गाडी चालविण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यासाठी महिलांना तब्बल 60 वर्षे संघर्ष करावा लागला होता. आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्यासाठी सौदी अरेबियातील महिला बऱ्याच वर्षांपासून संघर्ष करीत आहेत.
पुुरुषांच्या परवानगीशिवाय सौदीतील महिला घराबाहेर फिरण्यास जाऊ शकत नाहीत. जर एखादी महिला घराबाहेर पडलीच तर तिच्यासोबत कुटुंबातील एखादा पुरुष असावाच लागतो. कुटुंबातील पुरुष सदस्य वगळता अन्य पुरुषांशी बोलायलासुद्धा महिलांना बंदी आहे. महिला गैरमुस्लीम व्यक्तीशी लग्न करू शकत नाहीत. याखेरीज सुन्नी महिला शिया पुरुषांशी लग्न करू शकत नाहीत. पुरुषांची परवानगी असल्याखेरीज सौदीतील महिला वैद्यकीय उपचारही घेऊ शकत नाहीत. तेथील मुली बार्बी डॉलबरोबर खेळू शकत नाहीत; कारण तशी परवानगीच नाही. पुरुषांना असे वाटते की, बार्बी डॉलचे कपडे गैरइस्लामी असतात. असे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येऊ लागले आहेत आणि महिलांना खुल्या हवेत श्वास घेता येईल, या दिशेने वाटचाल सुरू आहे.
सौदी अरेबियाची अर्थव्यवस्था क्रूड तेलावर आधारित आहे. तेलाच्या घसरणाऱ्या दरांमुळे काही वर्षांपूर्वी जेव्हा त्या देशावर आर्थिक संकट घोंगावत होते तेव्हा तेथील शासकांनी कमाईचे अन्य मार्ग शोधायला सुरुवात केली. त्यांनी पर्यटनाला प्रोत्साहन दिले. महिलांना स्टेडियममध्ये जाऊन फुटबॉलचे सामने पाहण्याची परवानगी दिली. आपल्या पालकांच्या परवानगीखेरीज नाव बदलण्याची मुभा महिलांना देण्यात आली. महिलांच्या कोंदटलेल्या जीवनात बदल होत आहेत, याचे प्रत्यंतर महिला कार्यकर्त्यांच्या सुटकेतून आले आहे. धर्माची भिंत ओलांडून महिलांचे स्वातंत्र्य आणि सशक्तीकरणाची धारणा जागतिक स्तरावर प्रबळ झाली आहे. एक उदारमतवादी देश म्हणून सौदी अरेबियाने आपले “ब्रॅंडिंग’ सुरू केले आहे. कट्टरवादी विचारांमुळे कोणत्याही देशाचा विकास होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. विकासासाठी उदारमतवादी विचारसरणी असणे अत्यंत आवश्यक आहे.
सौदी प्रिन्स “व्हिजन 2030′ या प्रकल्पावर काम करीत आहेत. महिलांसाठी कडक धोरण असणारा देश म्हणून असलेल्या प्रतिमेतून सौदी बाहेर पडू इच्छित आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या प्रयत्नांमधून सौदी अरेबियातील कार्यबळात महिलांची हिस्सेदारी 35 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे.