कोल्हापूर – कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील बाजारपेठ, सरकारी कार्यालय परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या दोघा अट्टल चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात कोल्हापूर पोलिसांना यश आले आहे. संशयित आरोपी सुरेश कृष्णमूर्ती शेट्टी (वय 35, रा. व्यंकटेश पार्क मुडशिंगी, ता. करवीर) आणि त्याचा साथीदार मायाप्पा शिवाप्पा कोळी (25, रा. पाटील मळा, करोली, ता. मिरज, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचेकडून पाच लाख किमतीच्या 15 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी बोलताना दिली.
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील वेगवेगळी तपास पथके तयार शोध घेतला गेला. पोलीस अंमलदार सोमराज पाटील यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दुचाकी चोरीचे गुन्हे करणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार सुरेश शेट्टी हा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी कोल्हापुरातील झेवियर्स हायस्कूल कसबा बावडा रोड रमणमळा परिसरात येणार आहे.
त्यानुसार रमणमळा परिसरात सापळा रचून संशयित आरोपी सुरेश शेट्टी याला ताब्यात घेतले. त्याचेकडे नंबर नसलेली दुचाकी मिळून आली. त्याचेकडे सखोल चौकशी केली असता साथीदार मायाप्पा कोळी याचे मदतीने आणखी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार या दोघा चोरट्यांना अटक करून त्यांचे ताब्यातून चोरीच्या 15 दुचाकी हस्तगत केल्या.