दुचाकी वाहन चोरांचा सुळसुळाट

हडपसर, चतुश्रृंगी, सिंहगड, भारती विद्यापीठ, कोंढवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत प्रमाण अधिक

 

  •  सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करताना काळजी घेण्याचे आवाहन

 

पुणे – पुणे शहरात वाहन चोरीचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. दररोज, सरासरी पाच वाहनांची चोरी होत असून यातही हडपसर, चतुश्रृंगी, सिंहगड, भारती विद्यापीठ आणि कोंढवा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरांचा सुळसुळाट अधिक आहे. यामुळे संबंधीत पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनीक ठिकाणी वाहन उभे करताना नागरिकांनी नक्कीच काळजी घ्यावी, अशी परिस्थिती आहे.

वाहन चोरांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी सातत्याने नाकाबंदी आणि सराईतांची झाडाझडती घेतली तसेच अनेकदा विशेष मोहिम राबवली जात आहे. मात्र, वाहन चोरीचा आलेख वाढताच आहे. सराईत वाहन चोर जामिनावर सुटल्यावर पुन्हा वाहन चोरीकडे वळतात. तर, दुसरीकडे अल्पवयीन मुले व तरुण नव्याने वाहन चोरीच्या गुन्हे करीत आहेत.

यामुळे वाहन चोरांवर अंकुश ठेवणे अवघड होत आहे. वाहन फक्त विकण्याच्याच उद्देशाने चोरले जात नाही. यातील बहुतांश गुन्हे हे चोरलेले वाहन पेट्रोल संपेपर्यंत वापरुन नंतर ते रस्त्यात सोडून देण्यासारखे प्रकारही घडले आहेत. तर, काही तरुण मित्र, मैत्रिणींवर प्रभाव पाडण्यासाठी वाहन चोरतात. यातून रस्त्यावर वेबारस सोडलेल्या वाहनांचे मालक शोधणे हे ही एक मोठे दिव्य पोलिसांपुढे असते. यामुळे वाहन चोरी एक प्रकारची सामाजिक समस्याच झाली आहे.

जे विकलं जात तेच चोरलं जात…
ज्या वाहनांना बाजारात मोठी मागणी आहे, त्याच वाहनांची चोरी होते. यामध्ये हिरो होंडा, ऍक्‍टिव्हा मोपेड, पल्सर अशा ठराविक कंपन्यांच्याच दुचाकी चोरल्या जातात. वाहनांचे लॉक डिकी उघडून तसेच हॅण्डलला झटका मारुन अशी वाहने चोरली जातात. पल्सरसारख्या जास्त सीसीच्या दुचाकी किंवा ऍक्‍टिव्हासारख्या मोपेड चोरुन या वाहनांचा वापर सोन साखळी चोरी सारख्या गुन्ह्यात केला जातो. ग्रामीण भागात विनाकागदपत्रांची अशी वाहने अगदी किरकोळ किंमतीत विकली जातात. याची एक यंत्रणाच शहरात कार्यरत आहे. वाहन चोरले की त्याच रात्री ते इररत्र रवाना केले जाते.

पोलीस आयुक्तांचे आदेश…
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधिक राखण्याच्या दुष्टीने गुन्हेगारांवर कडक कारवाया करण्यास प्राधान्य दिले आहे. याचाच एक भाग म्हणून मोक्का आणी तडीपारीच्या कारवाया करत संघटीत टोळ्यांना मोठा धक्का दिला आहे. आता त्यांनी वाहन चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे ठरवले आहे. त्यांनी सराईत वाहन चोरांनी झाडाझडती घेण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.

सार्वजनीक ठिकाणी तसेच घराच्या बाहेर लावलेली वाहने रात्री नऊ ते सकाळी सहाच्या दरम्यान चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे. नागरिक हजारो आणि लाखो रुपये खर्च करुन वाहने खरेदी करत असतात, यांच्या सर्व्हिसिंगसाठीही नियमीत हजारो रुपये खर्च करतात. मात्र, वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणतीच काळजी घेत नाहीत. एखाद्या नामवंत कंपनीचे दणकट असलेले हजार दिड हजाराचे लॉक जरी वाहनाला बसवले तरी आपले वाहन चोरीला जाणार नाही. मात्र, महत्वाच्या असणाऱ्या लॉककडेच नागरिक दुर्लक्ष करतात.
– सुरेंद्र देशमुख, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.