पुणे – शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी लांबविणाऱ्या पाच चोरट्यांना वानवडी पोलिसांनी अटक केली. हे चोरटे मूळचे नांदेड जिल्ह्यातील असून दुचाकी चोरीसाठी ते ते पुण्यात येत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून 23 दुचाकी जप्त केल्या आहेत. या चोरट्यांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे.
गौस मीरसाहेब शेख (19), रशिद मेहबूब शेख (20), शाहरुख पापामियॉं शेख (21, तिघे रा. बाऱ्हाळी, मुखेड, जि. नांदेड) यांना अटक करण्यात आली आहे. वानवडी परिसरात झालेल्या दुचाकी चोरीचा तपास सुरू होता. याचदरम्यान, पोलीस कर्मचारी सुदर्शन बोरावके, शिरीष गोसावी यांना चोरट्यांची माहिती मिळाली. अधिक तपास केला असता, या चोरट्यांना मूळ गावात जाऊन पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक सावळाराम साळगावकर, उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे, विनोद भंडलकर, प्रदीप गुरव, युवराज दुधाळ यांनी ही कारवाई केली.
नवी मुंबईतही कारनामे
दुचाकी चोरीचे गुन्हे करण्यासाठी आरोपी शेख आणि त्यांच्याबरोबर असलेले दोन अल्पवयीन साथीदार पुण्यात आले होते. त्यांनी पुण्यासह नवी मुंबई, उदगीर जि. लातूर येथे दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.