कोपरगाव (प्रतिनिधी) – कोपरगाव शहरातील विशाल सरोदे व अशोक सरोदे यांच्या मालकीच्या श्रद्धा दुचाकी शो-रूमला शॉर्टसर्किटने आग लागल्याने शोरुमचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. यात दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास श्रद्धा होंडा शो-रूमच्या सर्व्हिस विभागात अचानक आगीसह धुराचे लोळ स्थानिक नागरिकांना दिसले. शो-रूममधील सोलर पॅनेल, ऑईलचे डबे, फायबरचे साहित्य, मोटारसायकलीचे इतर साहित्यास आग लागल्याने आगीचा भडका उडाला. शो-रूमच्या शेजारी नागरी वसाहत असल्याने सर्वांची पळापळ सुरु झाली. आगाची माहिती कोपरगाव नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाचे अधिकारी संभाजी कार्ले यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी तातडीने दाखल होवून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आगीच्या भडकत्या ज्वाला चपळाईने शमविल्या. अग्निशामक दलाचे फायरमन कार्तिक मालकर, चेतन गव्हाणे, चालक संजय विधाते, प्रशांत शिंदे यांचा त्यात मोलाचा वाटा आहे. नगरसेवक जनार्दन कदम, अनिरुद्ध काळे, वैभव गिरमे, सचिन खैरे, राजेंद्र बोरावके, विलास ताम्हाणे, राहुल जाधव, बल्लू पटेल, यांच्यासह स्थानिक नागरीकांनी विशेष मदत करून 20 मिनिटांत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
अग्निशामक दलाने थोडा जरी उशीर केला असता, तरी परिसरातील नागरी वस्तीसह शेजारच्या दुकानांचे मोठे नुकसान झाले असते. शो-रूमच्या शेजारी विलास ताम्हाणे यांच्या शेडचे या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान शो-रूम सकाळी उघडण्यापूर्वी ही आग लागल्याने जीवितहानी झाली नाही. या आगीत अनेक मोटारसायकलींच्या स्पेअरपार्टसह ऑईलचे बंद डबे, फर्निचर, सीसीटीव्ही, गाड्यांच्या पेट्रोल टाक्या, महत्त्वाची कागदपत्रे, संगणक प्रणाली जळून खाक झाल्याने नुकसानीचा आकडा सांगता येत नसल्याचे शो-रूमचे प्रमुख विशाल सरोदे यांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करुन अकस्मात जळीतचा गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरू केला आहे. करोनाच्या भीतीने व लॉकडाऊनमुळे सर्वच व्यावसायिकांचे आर्थिककंबरडे मोडले आहे. दोन महिन्यांपासून मोटारसायकल विक्री व दुरुस्ती व्यवसाय ठप्प आहे. नवीन गाड्या, साहित्य विक्री अभावी धूळखात पडले आहे. दोन महिन्यांनंतर थोड्या प्रमाणात व्यवहार सुरू होत असताना सरोदे कुटुंबाला आगीच्या रूपातून पुन्हा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
आ. काळे यांनी केली पाहणी
आमदार आशुतोष काळे यांनी सरोदे यांच्या जळीत श्रध्दा शो-रूमला भेट देवून पाहणी केली. सरोदे परिवाराला आलेल्या संकटातून सावरण्यासाठी अपेक्षित ते सहकार्य करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.