पुणे – भरधाव जात असताना नियंत्रण सुटल्याने दुचाकी रस्ता दुभाजकास धडकली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला एक युवक गंभीर जखमी झाला आहे. औंध भागात ब्रेमेन चौकाजवळ रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सुधीर कृष्णकांत कदम (वय 26, रा. इंदिरा वसाहत,औंध) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. सुधीर हा रविवारी सायंकाळी त्याचा मित्र नितीन काकडे (वय 20 रा. औंध) यास दुचाकीवर मागे बसवून सांगवी येथून औंध भागात येत होता. दरम्यान, गणेशखिंड रोडवर ब्रेमेन चौक ओलांडल्यानंतर हॉटेल पिचोलासमोरील रस्ता दुभाजकास दुचाकी धडकून ते दोघे खाली कोसळले. या दोघांनाही नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात दाखल केले. दुचाकीचालक सुधीर याने हेल्मेट परिधान केलेले नव्हते, त्यामुळे त्याच्या डोके तसेच तोंडाला गंभीर मार लागला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तसेच नितीन याच्याही डोक्यास आणि पायास मार लागला आहे. चतु:शृंगी पोलीस तपास करीत आहेत.