पुणे – गणेशोत्सवासाठीचे साहित्य खरेदी करून निघालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नियंत्रण सुटून दुचाकी घसरल्याने तिचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना नगर रस्त्यावर घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी महिलेला किरकोळ दुखापत झाली.
अनिता मंगेश विधाते (वय 31, रा. काळूबाईनगर, वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. अनिता आणि त्यांची आई संगीता पांडुरंग जाधव (वय 52) नगर रस्त्यावरील चंदननगर परिसरात दोन दिवसांपूर्वी सायंकाळी गणेशोत्सवाची खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. सायंकाळी पावणेआठच्या सुमारास दुचाकीस्वार अनिता आणि त्यांची आई संगीता वाघोलीकडे निघाल्या होत्या.
वाघेश्वर मंदिर चौकात त्यांची दुचाकी घसरली आणि दुचाकीस्वार अनिता यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान गुरूवारी ( 9 सप्टेंबर) त्यांचा ससून रूग्णालयात रात्री मृत्यू झाला. सहायक निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.