क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीवर कोसळला दु:खाचा डोंगर, करोनामुळे आईपाठोपाठ बहिणीचेही निधन

नवी दिल्ली – जगासह देशातही करोनाने थैमान घातले आहे. देशात दिवसेंदिवस करोनाबाधितांचा आकडा वाढत असून, अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशातच भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू वेदा कृष्णमूर्तीच्या घरच्यांवरही करोनाने घाव घातला आहे.

वेदा कृष्णमूर्तीने ( Veda Krishnamurthy ) करोनामुळे आपल्या आईला आणि बहिणीला गमावले आहे. दोन आठवड्यांपूर्वी करोनामुळेच तिच्या आईचेही निधन झाले होते. मागील महिन्यात वत्सला शिवकुमार आणि आई चेलुवम्बदा देवी यांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते; परंतु मागील आठवड्यात वेदाच्या आईचे निधन झाले होते.

आई गेल्याच्या दु:खातून वेदा सावरली नाही, तोच बहीण वत्सलालाही करोनाने हिरावून घेतले. करोनामुळे आज 45 वर्षीय वत्सला शिवकुमारने अखेरचा श्‍वास घेतला. चिकमागालुरू येथील खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते.

दरम्यान, 24 एप्रिलला वेदाने आपल्या आईचं निधन झाल्याची माहिती ट्‌विटरवरून दिली होती. अम्माच्या निधनानंतर तुम्ही केलेल्या सांत्वनाबद्दल मी आभारी आहे. आईशिवाय माझ्या कुटुंबाचा विचारही केला जाऊ शकत नाही, हे तुम्ही समजू शकता. तुम्ही माझ्या बहिणीसाठी प्रार्थना करा, माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. तुम्ही माझ्या प्रायव्हसीचा सन्मान कराल, हीच अपेक्षा आहे. या परिस्थितीमधून जाणाऱ्या सर्वांबद्दल मला संवेदना आहे, असे वेदाने म्हटले होते. मात्र, आता करोनाने बहिणीचाही मृत्यू झाल्यामुळे तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.