पत्रावळीतून दोन टन सेंद्रिय खताची निर्मिती होणार

रेडा – जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापुरातील मुक्‍कामानंतर पुढे मार्गस्थ होताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्वच्छ वारी – स्वस्थ वारी- हरित वारी- निर्मल वारीतील विद्यार्थी, इंदापूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने इंदापूर महाविद्यालयाच्या आठशे विद्यार्थ्यांनी तीन तासांत शहरातील पालखी मुक्‍काम, बसस्थानक, महाविद्यालय, पालखी मार्ग, विविध भागातील परिसराची स्वच्छता करून शहर चकाचक केले.

या जमा झालेल्या पत्रावळीतून दोन टन सेंद्रिय खताची निर्मिती होणार आहे. इंदापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी रामनिवास झंवर, संस्थेचे सचिव मुकुंद शहा यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे म्हणाले की, महाविद्यालयाने पालखी काळात 2 लाख 25 हजार पत्रावळ्यांचे वाटप केले होते. पालखीतील उष्टयावळ्यांचे विद्यार्थ्यांनी संकलन करून महाविद्यालयाच्या आवारातील दोन खड्डयांमध्ये एकत्रित करून यावर जैविक फवारणी केली. यातून दोन ते तीन टन सेंद्रिय खत निर्मिती होणार असून शेतकऱ्यांना खताचे मोफत वाटप केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यात समाज प्रबोधन केले.

संस्थेचे उपाध्यक्षा पद्मा भोसले, नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रा. गौतम यादव, डॉ. भिमाजी भोर, डॉ. गजानन कदम, प्रा. कल्पना भोसले, प्रा. मनीषा गायकवाड, प्रा. भारत शेंडे, प्रा. लतीफ शेख, स्वामीराज भिसे, प्रा. तानाजी कसबे यांनी नियोजन केले. विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश पांडे, डॉ. प्रसन्नजीत फडणवीस, रासेयोचे संपर्क अधिकारी डॉ. अतुल साळुंके, मुंबई विद्यापीठाचे व्यवस्थापन सदस्य मुकादम तसेच डॉ प्रभाकर देसाई उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.