थ्रीडी वॉकेथॉनमध्ये दोन हजार जणांनी नोंदवला सहभाग

कराड अर्बन बॅंकेतर्फे आयोजन

कराड – कराड शहर व परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्याचा कानमंत्र देण्याचा मानस ठेवून समाजात जागृती करण्याच्या दृष्टीने कराड अर्बन बॅंकेमार्फत थ्रीडी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कराड शहर व परिसरातील दोन हजाराहून अधिक नागरिकांनी सहभागी होत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.

आजच्या धकाधकीच्या जीवनात स्थूलता आणि मधुमेह या आजारांनी जणू आपल्या जीवनावर आक्रमण केले आहे. प्रामुख्याने चुकीची जीवनशैली आणि व्यायामाचा अभाव हेच याला कारण आहे. यावर चालणे हा सर्वोत्तम व्यायाम मानला जातो डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी यासाठी चालणे हा साधा मंत्र सांगितला आहे. स्थूलता व मधुमेह निर्मूलन पद्धतीचे जनक कै. डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या स्थूलता विरोधी अभियानाचे ब्रॅंड ऍम्बेसेडर डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी दि. 15 सप्टेंबर रोजी 10 देशांतील 5 राज्यांत 100 विविध शहरांमध्ये एकाच दिवशी या थ्रीडी वॉकेथॉनचे आयोजन केले होते.

कराड शहरामध्ये या वैशिष्ट्यपूर्ण थ्रीडी वॉकेथॉनचे आयोजन करण्याचा मान कराड अर्बन बॅंकेस मिळाला होता. 5 किमीच्या या वैशिष्ट्यपूर्ण अभियानाचा शुभारंभ बॅंकेच्या मुख्य कार्यालयापासून कुटूंबप्रमुख सुभाषराव जोशी, बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव व संचालकांच्या हस्ते निशान फडकावून करण्यात आला. या उपक्रमासाठी विविध क्षेत्रातील विविध वयोगटातील महिला व पुरूषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. कराड अर्बन बॅंकेकडून नेहमीच समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा प्रकारचे उपक्रम सुरू ठेवावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्‍त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.