मुंबई – सध्या व्यवहारात दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा मोठ्या प्रमाणात गायब झाल्याचे सर्वत्र जाणवते आहे. या संबंधातील अधिकृत माहिती आरबीआयच्या अहवालात देण्यात आली आहे. गेल्या वर्षभराच्या काळात व्यवहारातून तब्बल एक लाख कोटी रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून गायब झाल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे.
18 सप्टेंबर रोजी हा अहवाल सादर करण्यात आला आहे. याच वर्षभराच्या काळात चार लाख कोटी रुपये मूल्यांच्या पाचशे रुपयांच्या चलनी नोटा बाजारात आल्या आहेत, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून नेमक्या कशा गायब झाल्या याचा खुलासा मात्र यात नाही. काही जणांनी आरबीआयनेच दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा छापण्याचे काम थांबवले असल्याची माहिती सांगितली होती.
तथापि, आरबीआयने सन 2019-20 या काळात दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा छापण्याचे काम थांबवले नव्हते, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे. दोन हजार रुपयांच्या ज्या चलनी नोटा व्यवहारातून गायब आहे त्याचे मूल्य एक लाख कोटी रुपये इतके आहे, याचाच अर्थ काळ्या धनाच्या रूपात हे पैसे लपवले गेले आहेत किंवा कसे यावर मात्र या अहवालात कोणताही प्रकाश टाकण्यात आलेला नाही.
8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारने देशात अचानक नोटबंदी जाहीर करून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. देशातील काळ्या पैशावर करण्यात आलेला हा सर्जिकल स्ट्राईक असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला होता.
तथापि, एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द करून त्याच्याऐवजी पाचशे व दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा चलनात आणल्या गेल्या होत्या. दोन हजाराची नोट बाजारात आल्याने त्यातून काळा पैसा कसा कमी होणार अशी शंका त्याच वेळी उपस्थित करण्यात आली होती.