व्यवहारातून कमी होत आहे सर्वांत मोठी नोट
पिंपरी – लॉकडाउनच्या काळात दैनंदिन व्यवहारामधून दोन हजार रुपयांची नोट गायब झाल्याचे चित्र आहे. एटीएममधूनदेखील दोन हजार रुपयांची नोट मिळत नसल्याने दोन हजार रुपयांची नोट बंद झाली की काय? असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. दोन हजारांच्या नोटांचा एक बंडल म्हणजे पूर्ण दोन लाख रुपये होत असल्याने धनाढ्यांनी याचा साठा केला असावा, अशी भीती काहीजण व्यक्त करत आहेत. तर दोन हजारांची नोट गळ्यात मारली जात नसल्याबाबत काहींनी आनंदही व्यक्त केला आहे. कारण दोन हजाराची नोट सुट्टी करण्यासाठी किमान तीनशे ते चारशे रुपयांची खरेदी करावी लागत होती.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर आता चार महिने देशभरात लॉकडाऊनचीच परिस्थिती आहे. या कालावधीत देशातील कृषी क्षेत्र वगळता सर्वच उद्योग ठप्प झाल्याने त्याचा देशाला मोठा अर्थिक फटका बसला आहे. अद्यापही देश या धक्क्यातून सावरलेला नाही. या कालवधीत आर्थिक व्यवहारांनादेखील पायबंद बसला आहे. दरम्यान, कंपन्या बंद पडल्याने नागरिकांची क्रयशक्ती घटल्याचे अनेक दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. कामगारांच्या नोकऱ्या गेल्याने आर्थिक व्यवहार मर्यादित प्रमाणात होऊ लागले आहेत. त्यामुळे अधिक रकमेच्या नोटा बाजारातून गायब झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
सध्या बाजारात दोन हजारांची नोट अभावानेच पहायला मिळत आहे. गेली चार महिन्यात बहुतांशी नागरिकांनी दोन हजारांची नोट अभावानेच हाताळली असल्याचा अनुभव सांगितला आहे. बॅंकामधून रोख स्वरुपात रक्कम काढणारे ग्राहक किंवा एटीएममधून काढलेल्या रकमेत दोन हजारांची नोट आता मिळत नाही.
दैनंदिन जीवनात मोठ्या रकमेचा व्यवहार करताना दोन हजारांची नोट उपयोगी पडत होती. मात्र, लॉकडाउनमुळे बेरोजगार झालेले कामगार, त्यांची घटलेली क्रयशक्ती आणि दैनंदिन व्यवहार करताना आलेल्या मर्यादा या कारणांमुळे या नोटांचा अन्य रकमांच्या तुलनेत तुटवडा भासत असावा. मात्र, कमी रकमेची खरेदी करताना, दोन हजाराची नोट चलनात वापरात आणण्यासाठी होणारा सर्वसामान्यांचा त्रास यामुळे कमी झाला आहे.
दोन हजाराच्या नोटांचा एक बंडल असेल, तर त्याच रकमेच्या नोटांकरिता पाचशे रुपयांचा नोटांचे चार बंडल जवळ बाळगणे काहीसे असुरक्षित असते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी साठेबाजी केल्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय रिझर्व्ह बॅंकेने या नोटांची छपाई बंद केल्याने त्याचा पुरेशा प्रमाणात बाजारात उपलब्ध नसल्याचे दैनंदिन व्यवहारातून दोन हजारांच्या नोटा कमी प्रमानात उपलब्ध असाव्यात.
– ऍड. गोरखनाथ झोळ, अध्यक्ष, धर्मवीर संभाजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था