भोयरे गांगर्डात चोरट्यांचा धुमाकूळ, दोन दिवसांत दोन घरफोड्या

सुपा – पारनेर तालुक्‍यातील भोयरे गांगर्डात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरीचे सत्र सुरूच असून ग्रामस्थ चोरट्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत. गेल्या तीन महिन्यात एक चोरी व पाच घरफोड्या करण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर चोरट्यांनी कहरच केला असून ग्रामस्थांची झोपच उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, चालू वर्षी भीषण दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाच्या वतीने जनावरांसाठी चारा छावण्या सुरू केल्या आहेत, जनवरांची देखभाल करण्यासाठी पशुपालक छावणीतच झोपत असल्याचा फायदा उठवत चोरट्यांनी दररोज एका वस्तीवर हात साफ करण्याचा धडाका लावला आहे.

बुधवार दिनांक 1 मे रोजी गावचा यात्रा उत्सव असल्याने बाहेर गावी दिलेल्या मुली व पाहुणे यात्रेसाठी गावात आले आहेत. यादरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.दोन दिवसापूर्वी दादासाहेब जवक यांच्या घरी त्यांच्या पत्नी लताबाई या घराबाहेर पढवित झोपल्या असताना चोरट्यांनी त्यांचे तोंड दिबून गळ्यातील दीड तोळ्याचे दागिने लंपास केले. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी रात्री 9 वाजता गावात करमणुकीचा कार्यक्रम चालू होताच चोरट्यांनी काटे यांच्या वस्तीवरील भाऊसाहेब चांगदेव रसाळ यांचे घर फोडण्याचा प्रयत्न केला मात्र भाऊसाहेब जागे झाल्याने पुढील अनर्थ टळला. चोरांनी पुन्हा दादासाहेब जवक यांच्या घरावर दगड व विटांचा मारा केला यादरम्यान त्यांचा मुलगा बापू याने आरडाओरडा केल्याने चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. यादरम्यान गावातील ग्रामस्थ घटनास्थळी धावले.

याबाबत सुपा पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी देखील गावात भेट देऊन विचारपूस केली. रात्री 1 नंतर ग्रामस्थ घरी गेल्यानंतर पवार वस्तीवरील शशिकांत बाजीराव पवार यांच्या बंद घराचा दरवाजा कटावणीच्या साहाय्याने उचकटून घरात प्रवेश केला व कपाटाची उचकापाचक करून त्यांच्या आईच्या गळ्यातील दिड तोळ्याचे दागिने घेऊन पेट्या घराबाहेर घेऊन त्याचीही उचकापाचक केली.

सकाळी उठवल्यानंतर त्यांचे बंधू शरद पवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सरपंच भाऊसाहेब भोगाडे, उपसरपंच दौलतराव गांगड, संचालक आप्पासाहेब रसाळ यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी सुपा पोलिसांना संपर्क केला असता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शशिकांत पवार व दादासाहेब जवक यांच्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजयकुमार सोने हे. क्वां.शेरकर हे करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.