श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या बंदिपोरा आणि अनंतनाग जिल्ह्यांत सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. यातील पहिली चकमक अनंतनाग जिल्ह्याच्या वेरीनाग भागातील खागुंद येथे झाली.
तेथे काही दहशतवादी आश्रयाला आले असल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाली होती. त्यानुसार तेथे नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली. तेथे एक दहशतवादी ठार झाला. त्याचे बाकीचे साथीदार पळून गेल्याचे सांगितले जात आहे.
दुसरी चकमक बंदिपोरा जिल्ह्यातील हजीन भागात झाली. तेथील चकमकीत लष्कर ए तोयबाचा दहशतवादी मारला गेला. त्याची ओळख पटली असू,न त्याचे नाव इम्तियाज अहमद दर असे आहे. याच जिल्ह्यातील शागुंद येथे नागरिकांची जी हत्या झाली होती त्यात हा सहभागी होता, असा कयास आहे.