श्रीनगर : जम्मू-कश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाचे दोन दहशतवादी मारले गेले. नवीद अहमद भट उर्फ फुर्गन आणि अकिब यसीन भट अशी ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. यातील नवीद हा कुलगाममधील कायमोह येथील आणि अकिब हा कुलगामधीलच वाहपोरा कायमोह येथील रहिवासी होता, असे जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी पत्रकारांना सांगितले.
नवीद भट हा 2018 मध्ये लष्कर ए तोयबाच्या कारवायांमध्ये सामील झाला होता. त्याच्याविरोधात 7 एफआयआर नोंदवण्यात आल्या होत्या. तर आकिब हा जून 2019 पासून लष्कर ए तोयबाच्या कारवायांमध्ये सक्रिय होता. जिल्ह्यातल्या संगम बिजबेहरा परिसरातल्या नयना गावात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यावर चकमकीला सुरुवात झाली. घटनास्थळावरून आतापर्यंत दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.
याशिवाय आणखी एका घटनेमध्ये बरामुल्ला पोलिसांनी हिज्बुल मुजाहिदीनचा स्वयंघोषित कमांडर जुनैद फारुख पंडीत या आणखी एका दहशतवाद्याला अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तुल आणि 30 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.