श्रीनगर – लष्कर-ए-तोयबाचा कमांडर उमर मुश्ताक खांडेय याच्यासह दोन दहशतवादी आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाले. पुलवामा जिल्ह्यातील पम्पोरे येथे ही चकमक झाली.
यावर्षी जानेवारी महिन्यात दोन पोलिसांची जी हत्या झाली होती त्या प्रकरणात उमर मुश्ताक याचा हात होता. लोकांमध्ये दहशत पसरणाऱ्यांना आणि काश्मीर खोऱ्यांत खोडसाळपणा करणाऱ्यांना नेस्तानबूत करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजयकुमार यांनी म्हटले आहे.
त्यांनी ट्विटरवर उमर मुश्ताक याचा खात्मा झाल्याची माहिती दिली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांना जे दहा टॉपचे अतिरेकी वॉंटेड आहेत त्यात उमर मुश्ताकचा समावेश होता. त्याच्या समवेत जो दुसरा अतिरेकी ठार झाला आहे त्याचे नाव मात्र अजून समजलेले नाही.