पुणे : रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांना चाकूचा धाक दाखवून लूटणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गुन्हेशाखेच्या युनिट 4 च्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून 7 मोबाईल व 1 ऍक्टिव्हा असा 1 लाख 10 हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. यातील एका आरोपीवर तब्बल 55 गुन्हे दाखल आहेत. तो पॅरोलवर सुटला होता, मात्र दैनंदिन खर्च भागेना म्हणून त्याने पुन्हा गुन्हे सुरु केले.
व्यंकटेश दत्ता तगारे (35,रा.खडकी रेल्वे स्टेशन समोर), सनी सतीश गायकवाड (27,रा.मुंढवा) अशी आरोपींची नावे आहेत. यातील व्यंकटेश विरुध्द पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात घरफोडी, वाहनचोरी, जबरीचोरी असे 55 गुन्हे दाखल आहेत. तर सनी गायकवाड विरुध्द मुंबई येथे एनडीपीएस प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
येरवडा पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्हयात फिर्यादी वॉर्डबॉय हा ड्युटी संपवून गुंजन थिएटर येथून पायी जात होता. यावेळी ऍक्टीव्हावरुन आलेल्या दोघा आरोपींनी त्याला कोठे जायचे आहे असे विचारले. त्याने वडगाव शेरी येथे जायचे असल्याचे सांगितल्यावर त्याला दुचाकीवर बसवून कोरेगाव पार्क येथे नेण्यात आले. तेथे त्याच्या गळ्याला चाकू लावून रोख रक्कम व मोबाईल चोरुन नेला.
या गुन्हयाचा तपास करत असताना पोलिस उपनिरीक्षक विजय झंजाड यांना आरोपींचा ठावठिकाणा मिळाला. त्यानूसार यातील आरोपी खडकी येथे रहात असल्याची खबर मिळाली. त्यानूसार त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता चोरीचे मोबाईल आणि गुन्हयात वापरलेले दुचकी हस्तगत करण्यात आली. तगारे यांनी ऍक्टिीव्हा एक महिण्यापुर्वी देहूरोड येथून चोरली आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे, पोलिस उपनिरीक्षक विजय झांजड, पोलिस कर्मचारी सचिन ढवळे, रमेश राठोड, अब्दुल सय्यद, गणेश सोळुंखे, सागर घोरपडे, गणेश काळे, सुरेंद्र साबळे, विशाल शिर्के, भालचंद्र बोरकर, सुहास कदम, निलेश शिवतरे, अशोक शेलार यांच्या पथकाने केली.
पॅरोलवर सुटून पुन्हा गुन्हे सुरु
यातील आरोपी तगारे हा पॅरोलवर सुटला आहे. त्याने काही दिवस मित्रांकडून पैसे उधार घेऊन उदरनिर्वाह केला तसेच मजुरीही केली. मात्र मद्यपान व इतर खर्च भागवणे शक्य न झाल्याने त्याने पुन्हा चोरी करण्याचे सत्र सुरु केले.