पॅरिस : फ्रान्सच्या उत्तर-पूर्व भागात फ्रेंच हवाई दलाच्या दोन राफेल लढाऊ विमानांची टक्कर झाली. विमानांच्या धडकेत दोन वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. फ्रेंच वायुसेनेने जारी केलेल्या माहितीनुसार, बुधवारी स्थानिक वेळेनुसार 12:30 वाजता ईशान्य फ्रान्सच्या आकाशात राफेल लढाऊ विमानांची टक्कर झाली. टक्कर झाल्यानंतर दोन्ही विमाने जमिनीवर कोसळली. जर्मनीमध्ये इंधन भरून विमाने परतत असताना हा अपघात झाला. एका विमानात दोन पायलट होते तर दुसऱ्या विमानात एक पायलट होता. या दुर्घटनेतून दुसऱ्या जेटचा पायलट सुखरूप बचावल्याचे फ्रेंच अधिकाऱ्यांनी सांगितले.
फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी केली पुष्टी –
फ्रान्सचे संरक्षण मंत्री सेबॅस्टिन लेचेर्नू यांनी त्यांच्या X खात्यावर या घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, फ्रान्सच्या ईशान्य प्रदेशातील म्युर्थ एट मोसेले येथे बुधवारी दुपारी दोन राफेल लढाऊ विमाने हवेत धडकली. दोन्ही विमानांची टक्कर होण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हा अपघात ईशान्य फ्रान्समधील कोलंबे-ले-बेलेस शहरात घडल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अपघाताच्या कारणांचा अहवाल लष्करी अधिकारी काही दिवसांत सादर करतील.
Nous apprenons avec tristesse les décès du capitaine Sébastien Mabire et du lieutenant Matthis Laurens, lors d’un accident aérien en mission d’entraînement en Rafale.
La Nation partage la peine de leurs familles et frères d’armes de la Base aérienne 113 de Saint-Dizier.
— Emmanuel Macron (@EmmanuelMacron) August 14, 2024
देशांकडे आहे राफेल –
याआधी डिसेंबर 2007 मध्ये दक्षिण-पश्चिम फ्रान्समधील न्यूविक शहराजवळ एक राफेल जेट क्रॅश झाले होते. राफेल विमानाचा हा पहिलाच अपघात मानला जात आहे. त्यानंतर, सप्टेंबर 2009 मध्ये, चाचणी उड्डाण पूर्ण करून चार्ल्स डी गॉल विमानवाहू वाहक पेर्पिग्नानच्या किनाऱ्यावर परतत असताना दोन राफेल विमाने कोसळली. ज्यात एक पायलट मारला गेला. फ्रान्सशिवाय राफेल विमाने इजिप्त, भारत, ग्रीस, इंडोनेशिया, क्रोएशिया, कतार आणि संयुक्त अरब अमिराती वापरतात.