पुणे – नवरा बायकोचा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यावर दोन गावठी पिस्तूल आणी 10 जीवंत काडतूसे असा शस्त्रसाठा पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणात फिर्यादी महिलेच्या पतीसह बारामतीमधील एका सराईत गुन्हेगारासस जेरबंद करण्यात आले आहे. ही कारवाई चंदननगर पोलिसांनी केली.
बाळासाहेब उमाजी मदने(रा.चौधरी वस्ती) व सुग्रीव अंकुश भंडलकर(रा.बारामती) अशी अटक आरोपीची नावे आहेत. यातील सुग्रीव हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर ग्रामीण पोलिसांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार चंदननगर पोलीस ठाण्यात एका महिलेने पतीविरुध्द घरगुती हिसाचाराची तक्रार दिली होती. यावेळी तीने पतीकडे काडतुसे असल्याने आपल्या जीवाला भिती असल्याची माहिती दिली . त्यानूसार पोलिसांनी पतीला चौकशीसाठी बोलावून घेतले. तो कारमधून पोलिस ठाण्यात आल्यावर त्याच्या कारची झडती घेतली असता, त्यामध्ये चार काडतूसे आढळून आली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घरी गावठी पिस्तूल असल्याचे सांगितले. त्याच्या घराच्या झडतीत एक गावठी पिस्तूल दोन काडतूसे लोड केल्यासहीत सापडले.
यानंतर मदनेला न्यायालयात हजर करुन पोलीस कोठडी घेण्यात आली. यामध्ये त्याने पिस्तूल व काडतूसे भंडलकर याच्याकडुन 40 हजाराला विकत घेतल्याचे सांगितले. त्यानूसार पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव यांनी बारामती तालूक्यातील खोडस येथे जाऊन भंडलकर यास ताब्यात घेतले. त्याच्या घरझडतीत एक गावठी पिस्तूल व चार काडतूसे सापडली. त्याचे रेकॉर्ड तपासले असता, तो ग्रामीण भागातील सराईत गुंड असल्याचे निष्पन्न झाले.
त्याच्याविरुध्द बारामती तालुका, भिगवण, वडगाव निंबाळकर या पोलीस ठाण्यांत दरोडा, जबरी चोरी व महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याने गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी दोघांकडून दोन गावठी पिस्तूल, दहा काडतूसे आणी एक स्विफ्ट कार असा साडेतीन लाखाचा ऐवज हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस आयुक्त पंकज देशमुख, सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन जाधव, सहायक पोलीस फौजदार युसुफ पठाण, पोलीस हवालदार रोहिदा लवांडे, पोलीस नाईक श्रीकांत शेंडे, पोलीस शिपाई अमित कांबळे यांच्या पथकाने केली.