अतिधोकादायक स्थिती : प्रवास टाळण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन
कामशेत – पवन मावळातील थुगाव येथील पवना नदीवरील पुलाचे दोन पिलर ढासळले असून, हा पूल आता अतिधोकादायक झाला असल्याने कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांकडून वर्तविली जात आहे.
थुगाव येथील पवना नदीवरील पूल धोकादायक झाल्याने 15 ऑगस्ट 2019 पासून पुलावरील वाहतूक पाटबंधारे विभागाने बंद केली होती; मात्र तरीही नागरिक धोकादायकपणे पुलावरून वाहने घेऊन जात आहेत. पण दोन दिवसांपूर्वी या पुलाचे दोन पिलर ढासळले. त्यामुळे कोणत्याही क्षणी पूल पडू शकतो, तरी परिसरातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून या पुलावरून प्रवास करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अशोक शेटे यांनी केले आहे. तसेच परिसरातील ग्रामपंचायतींना पुलाच्या स्थितीची माहिती देण्यात आली आहे.