एसबीसी समाजास उच्च शिक्षण प्रवेशात दोन टक्के आरक्षण

मुख्यमंत्र्यांची हमी : कायदेशीर प्रक्रियेनंतर दोन टक्के आरक्षण देणार

नगर  – या वर्षीच्या मेडिकल प्रवेशात सध्या केलेल्या तरतुदी प्रमाणे ओबीसीच्या 19 टक्के आरक्षणापैकी ओबीसी व एसबीसी धरुन एकच सामाईक मेरीट लिस्ट करण्यात यावी आणि एसबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी. तथाकथित 50 टक्के आरक्षण मर्यादेची चिंता करु नका. कायद्यातील काही प्रक्रिया पुर्ण करुन स्वतंत्र 2 टक्के आरक्षणाचा कायदा लागू होईल याची पूर्ण खात्री मुख्यमत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरिश महाजन, एसबीसी चे मंत्री संजय कुटे, वैद्यकीय व उच्च शिक्षण सचिव संजय मुखर्जी आणि संबंधित उच्च अधिकारी वर्गासोबत विशेष मागास प्रवर्ग अन्याय निवारण कृती समितीची सविस्तर बैठक झाली. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी समाजास उच्च शिक्षण प्रवेशात 2 टक्के आरक्षणाची हमी दिली अशी माहिती एसबीसी साळी समाजाच्या लक्ष्मीनारायण शाळेचे सचिव महेश कांबळे यांनी दिली याचा फायदा नगरमधील साळी, पदमसाळी, कोष्टी व विणकर समाजाच्या विद्यार्थ्यास होणार होणार आहे.

दि.28 मे 2019 व नंतर पुण्यातील भेटीत विमाप्र अन्याय निवारण कृती समितीतर्फे मुख्यमंत्री यांच्याकडे अशा बैठकीची मागणी करण्यात आली होती. यासंबंधी आजच्या बैठकीत 25 मिनिटे सविस्तर चर्चा झाली. या शिष्टमंडळात एसबीसी अन्याय निवारण कृती समितीचे सरचिटणीस सुरेश पद्मशाली यांच्या सुचनेनुसार सर्वश्री भानुदास उकरंडे उर्फ सोलापूरकर, डॉ. चंद्रशेखर बारगजे, महाराष्ट्र राज्य स्वकुळसाली समाजाचे अध्यक्ष डॉ. अशोक दांडेकर, प्रसाद पाखले, किशोर चंदावरकर, सुदर्शन बोगा यांचा समावेश होता.

विमाप्रसाठी जाहीर केलेले 2टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याच्या प्रस्तावावर शासनातर्फे तातडीने कार्यवाही सुरु करण्यात आली आहे आणि विमाप्र वर्गावर यापुढे अन्याय होणार नाही, याची आम्ही काळजी घेवू, असे निसंदिग्ध आश्‍वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळास दिले. मुख्यमत्र्यांनी सचिवांना तात्काळ सूचना दिल्या की, त्यातूनही मेडिकल कॉलेज प्रवेशाबाबत काही अन्याय झाल्यास आमच्या निदर्शनास आणून दिले तर त्याचे निराकरण केले जाईल असे आश्‍वासन संजय कुटे यांनी दिले. समितीतर्फे मुख्यमंत्री व इतरांचे आभार व्यक्त करण्यात आले. शिष्टमंडळा तर्फे मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.