मुंबई – घरगुती ग्राहकांसाठी जूनचे वीजबिल भरण्याबाबत दिलासा देण्यात आला असून, त्यांना 3 एकसमान हप्त्यांमध्ये वीजबिल भरण्याची सवलत देण्यात आली आहे. तसेच संपूर्ण वीजबिल एकाचवेळी भरल्यास 2 टक्क्यांची सूट वीज बिलामध्ये देण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
वाढीव वीजबिलाच्या तक्रारींच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी वीजबिल अधिक येण्यामागची कारणे व ग्राहकांना दिलासा देण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
वीज नियामक आयोगाने लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची प्रत्यक्ष जागेवर जावून मीटरवाचन व वीजबिल वितरण न करण्यास महावितरणला आदेश दिले होते. एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापराची देयके आकारण्यात आलेली आहेत.
जूनमध्ये देयकाची रक्कम जास्त दिसण्याचे कारण म्हणजे लॉकडाऊन काळात (एप्रिल व मे महिना) आलेली सरासरी देयके ही कमी सरासरी युनिटने (डिसे. जाने. व फेब्रुवारी) हिवाळयातील वीज वापरावर दिलेली आहेत, असे ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे.
वीज बिलाच्या कमीत कमी 1/3 रक्कम भरता येईल. तसेच ज्या ग्राहकांनी या अगोदर संपूर्ण रक्कमेचे वीजबिल भरले असल्यास, त्यांना देखील 2 टक्के सूट त्यांच्या वीजबिलामध्ये देण्यात येणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्याचे निर्देश महावितरणला देण्यात आले आहेत.