शेतातील वादातून झालेल्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी

श्रीगोंदा – दुसऱ्याच्या शेतातील माती उचलून स्वतःच्या शेतात टाकण्यास मज्जाव केल्याने बाप-लेकांना दांडा-कोयत्याने जबर मारहाण केल्याची घटना अजनूज शिवारात घडली. यात बाप-लेक गंभीर जखमी झाले आहेत.

हा प्रकार शुक्रवारी (दि.13) दुपारी घडला. या प्रकरणी संजय दत्तात्रय क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्षीरसागर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्यादी क्षीरसागर हे त्यांचे वडील दत्तात्रय व भाऊ राजेंद्र यांच्यासोबत अजनूज शिवारातील गट क्रमांक 437 मधील शेताची पाहणी करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी गणेश पोपट क्षीरसागर हे फिर्यादी क्षीरसागर यांच्या शेतातील माती घमेले व खोऱ्याच्या साह्याने भरून बाजूच्या शेतात टाकत असल्याचे दिसले. त्याबद्दल जाब विचारला असता गणेश याने शिवीगाळ करीत संतोष रामदास क्षीरसागर व अर्जुन रामदास क्षीरसागर या दोघांना शेतात बोलावून घेतले. तसेच या तिघांनी माझे वडील व भाऊ यांना शिवीगाळ करीत खोऱ्याचा दांडा आणि कोयत्याने जबर मारहाण केली. या हल्ल्यात दत्तात्रय व राजेंद्र क्षीरसागर गंभीर जखमी झाले आहेत, तर फिर्यादी हे किरकोळ जखमी झाले आहेत. संतोष रामदास क्षीरसागर, अर्जुन रामदास क्षीरसागर, गणेश पोपट क्षीरसागर (तिघे रा. अजनूज) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.