ठाणे : ठाणेकरांसाठी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. ठाण्यातील दोघांना कोरोनाची लागण झालेले रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी एक हा कासारवडवली येथील रुग्ण होता तर दुसरा दोस्ती विहार येथे राहणारा रुग्ण होता. याच सोबत ठाण्यात एका कोरोनाच्या रुग्णाची भर पडून आतापर्यंत 26 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
ठाण्यात पहिला रुग्ण हा फ्रान्स वरून आलेला कासारवडवली येथीला रहिवासी होता. ट्रान्सफर भारतात आल्यावर दोन ते तीन दिवसांनी त्याला कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र काही दिवसातच औषधोपचार घेऊन तो पूर्ण बरा झाला. त्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले.
ठाण्यातील दुसरा रुग्ण हा सात एप्रिल रोजी पूर्ण बरा होऊन घरी आला आहे. हा रुग्ण लंडन येथून भारतात आला होता. त्यावर मुंबईच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र 14 दिवसांनंतर त्याची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आल्याने त्याला आता घरी सोडण्यात आले आहे.
दुसरीकडे ठाण्यात आणखी एका नवीन रुग्णांची भर पडली. रूग्ण जसलोक हॉस्पिटलमध्ये कॅशियर या पदावर कामाला होता. त्याच्यावर जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे ठाण्यातील एकूण रुग्णांची संख्या आता 26 इतकी झाली आहे. सर्वात जास्त रुग्ण हे कळवा विभागात आढळून आले आहेत.