भुज: गुजरात किनारपट्टीलगत दोन पाकिस्तानी मच्छिमारांना अटक करण्यात आली. ती कारवाई भारतीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) केली.
भारत-पाकिस्तान सागरी सीमेलगत असणाऱ्या गुजरातच्या हरामी नाला खाडीत बीएसएफचे पथक गस्तीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानी मच्छिमारांना पाहिले. संशयास्पद हालचालींमुळे त्यांना हटकवल्यावर त्यांनी नौका सोडून त्या भागातून निसटण्याचा प्रयत्न केला.
मात्र, बीएसएफच्या पथकाने त्यांना शिताफीने पकडले. त्यांची नौका जप्त करण्यात आली. पकडण्यात आलेले दोघे पाकिस्तानी मच्छिमारच असल्याचे प्राथमिक चौकशीतून उघड झाले. मात्र, पाकिस्तानी मच्छिमार भारतीय सागरी हद्दीत घुसल्याने संबंधित भागात बीएसएफने जोरदार शोध मोहीम हाती घेतली. काही दिवसांपूर्वी संबंधित भागातच पाच पाकिस्तानी नौका जप्त करण्यात आल्या होत्या.
केंद्र सरकारने ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द केला. त्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झाला आहे. त्याशिवाय, दहशतवादी संघटना बिथरल्या आहेत. त्यातून नापाक कारवाया घडवल्या जाण्याची शक्यता असल्याचा इशारा भारतीय सुरक्षा यंत्रणांना देण्यात आला आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दले अधिक सतर्कता बाळगत आहेत.