भूमी अभिलेखचे दोनजण लाचलुचपतच्या जाळ्यात

कराड  – घराबाबत हक्कसोडपत्र दस्ताची नोंद करून तसा उतारा देण्यासाठी खासगी इसमामार्फत दीड हजार रुपयांची लाच घेताना कराड भूमी अभिलेख कार्यालयातील निमताणदारास लाचलुचपत विभागाने सोमवारी सापळा रचून रंगेहात पकडले.

गोविंद सुभाष बेलवणलकर (वय 47), निमताणदार क्रमांक 2, भूमी अभिलेख कार्यालय कराड रा. कार्वे नाका, कराड व खाजगी इसम ताजुद्दीन इब्राहीम शिकलगार (वय 71, रा. रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे लाच घेतल्याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

मागील महिन्यातही याच विभागातील एकाला लाच घेताना रंगेहात पकडले होते. आता आणखी दोनजण या कारवाईत सापडल्याने भूमीअभिलेख कार्यालयात खळबळ उडाली आहे. याबाबत लाचलुचपत विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदाराच्या घराबाबत हक्क सोडपत्र दस्ताची नोंद करून तसा उतारा देण्यासाठी गोविंद बेलवणकर यांनी दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तक्रारदार व बेलवणकर यांच्यात तडजोडीअंती दीड हजार रुपये देण्याचे ठरले.

यानंतर तक्रारदाराने लाचेची मागणी करणाऱ्या बेलवणकर विरोधात लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली. लाचलुचपत विभागाने रविवारी हा सापळा लावला. मात्र या सापळ्यात कोणीही आले नाही. अखेर सोमवारी गोविंद बेलवलणकर याने खाजगी इसम ताजुद्दीन शिकलगार याच्याजवळ लाचेची रक्कम देण्याचे तक्रारदाराला सांगितले. सकाळी लाच स्वीकारताना शिकलगार व बेलवणकरला लाचलुचपतने सापळा लावून रंगेहात पकडले. या दोघांना अटक केली आहे. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक अशोक शिर्के व संजय साळुंखे, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक अशोक शिर्के करीत आहेत.

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)