गणेशमूर्तींच्या आकारावर करोनामुळे निर्बंध
पुणे – करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर येणारा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्याबाबतच्या 12 मार्गदर्शक सूचना शनिवारी राज्य सरकारने जारी केल्या.
उपनगरांसह मुंबई शहर, ठाणे आणि पुणे शहरांसाठी हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यामध्ये घरगुती गणेशमूर्तींवर दोन फुटांची तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींना चार फुटांची मर्यादा घातली आहे. याशिवाय शक्यतो सजावट आणि भपकेबाजी टाळावी तसेच विसर्जन घरी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
करोना साथीच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्यातील गणेशोत्सव मंडळासोबत बैठका घेतल्या होत्या. त्यात झालेल्या
चर्चेनुसार राज्य सरकारने उत्सवासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. गृहविभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी हे आदेश जारी केले आहेत.
शक्यतो घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरीच करावे. ते शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम तलावात विसर्जन करावे. सार्वजनिक उत्सवासाठी वर्गणी/देणगी स्वेच्छेने मिळत असल्यास घ्यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक सामाजिक उपक्रम जसे की रक्तदान शिबिरे वगैरे घेण्याला प्राधान्य द्यावे. श्रीगणेशाचे दर्शन ऑनलाइन, केबल, फेसबुक आणि वेबसाइटद्वारे करून देण्याची व्यवस्था करावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रीनिंगची पुरेशी व्यवस्था करावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणारे भाविक मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतराचे नियम पाळतील हे विशेषत्त्वाने पहावे.
हा गणेशोत्सव साधेपणाने परंतु धार्मिक आणि परंपरांना जपून करायचा आहे. मंडळांनी ऑनलाइनवर जोर द्यावा. कमीत कमी नागरिक दर्शनासाठी येतील यावर भर द्यावा, डिस्टन्सिंग आणि अन्य नियम पाळावेत. श्रीमंत भाऊ रंगारी गणेशोत्सव ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही ऑनलाइन सांस्कृतिक उत्सव करणार आहोत. मिरवणूक रद्द आहेच; परंतु घरगुती गणपतींनीही या विषयात पुढाकार घेऊन गणेशाचे विसर्जन नदीत न करता घरी, बादलीत करावे.
– पुनीत बालन,
उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊ रंगारी गणेशोत्सव ट्रस्ट