मंचर -आंबेगाव तालुक्यात बुधवारी (दि. 27) पुन्हा दोन पुरुष करोना बाधित आढळून आले आहेत. मुंबई येथून आलेल्या गांजवेवाडी येथील 55 व गिरवली येथील 50 वर्षीय वयोगटातील पुरुषांचा करोना वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली. तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी दोन करोना बाधित आढळून आल्याने आता तालुक्यात करोना बाधितांची संख्या एकूण 10 झाली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागात जवळे, निरगुडसर या दोन गावांमध्ये करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर जवळच असलेल्या गांजवेवाडी (वळती) येथे करोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या व्यक्तींना तपासणीसाठी पिंपरी (पुणे) येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
तहसीलदार रमा जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक निरीक्षक प्रदीप पवार यांनी तत्परतेने संबंधित गावांना भेटी दिल्या. यावेळी शरद सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष शिवाजी लोंढे, सरपंच रुबीना मुलाणी, तलाठी राजेश उमाळे, ग्रामसेवक एस. एस. खोल्लम, पोलीस पाटील प्रकाश लोंढे पाटील, आशा वर्कर आदी उपस्थित होते.