“शासन आपल्या दारी” या मेगा इव्हेंटसाठी पालकमंत्र्यांसह दोन आमदारांनी निधी देण्यास टाळले

जयंत कुलकर्णी
नगर – “शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाच्या खर्चासाठी प्रत्येकी 20 लाख रुपयांचा निधी देण्यासाठी आमदार प्रा. राम शिंदे, आमदार आशुतोष काळे व आमदार डॉ.किरण लहामटे या तीन आमदारांनी जिल्हा नियोजन कार्यालयाला पत्र दिले आहे. भाजप-शिंदे गटाच्या आमदारांना निधी देण्याचे आदेश असतांनाही भाजपच्या केवळ आ. प्रा. राम शिंदे वगळता अन्य पालकमंत्र्यांसह दोन्ही आमदारांनी “शासन आपल्या दारी’ या मेगा इव्हेंट कार्यक्रमासाठी निधी देण्याचे टाळले आहे.
“शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाचा मेगा इव्हेंट प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. येत्या 6 ऑगस्ट रोजी शिर्डीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या खर्चासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमध्ये उपलब्ध असलेल्या एकूण निधीच्या कमाल 0.2 टक्के निधी 1 कोटीच्या मर्यादेत खर्च करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मेगा इव्हेंट करण्याचे आदेश देऊन भाजप व शिंदे गटाच्या आमदारांना स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी 20 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. दि. 13 एप्रिल रोजी तसेच आदेश देण्यात आले आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम 6 ऑगस्ट रोजी होणार असला तरी भाजपच्या चार आमदारांपैकी केवळ आमदार प्रा. राम शिंदे यांनी निधी या कार्यक्रमाला देण्याचे पत्र दिले आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आमदार मोनिका राजळे व आमदार बबनराव पाचपुते या भाजपच्या आमदारांकडून अद्यापही निधी देण्याचे पत्र न देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात शिंदे गटाचा एकही आमदार नाही. विशेष म्हणजे नुकतीच सरकारमध्ये सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे व आमदार डॉ. किरण लहामटे हे राष्ट्रवादीचे आमदार असतांना तसेच त्यांना कोणताही आदेश नसतांना त्यांनी आमदार निधीतून 20 लाख रुपये या कार्यक्रमासाठी देण्याचे पत्र नियोजन विभागाला दिले आहे.
सत्ताधारी आमदारांच्या पत्राची प्रतीक्षा
भाजप, शिंदे गटासह आता अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्याने जिल्ह्यात सत्ताधारी आमदारांनी संख्या आठवर गेली आहे. भाजपचे चार व राष्ट्रवादीचे चार असे आठ आमदार या कार्यक्रमाला निधी देणार का असा प्रश्न आहे. त्यापैकी तीन आमदारांनी निधी दिली आहे. उर्वरित आमदार निधीबाबत पत्र देणार का याची आता प्रतीक्षा आहे.
शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी 500 बसेस
शासन आपल्या दारी या उपक्रमामध्ये सुमारे 26 हजारहून अधिक लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या लाभार्थ्यांना त्यांच्या तालुक्यातील शिर्डी येथील कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी तब्बल 500 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या लाभार्थ्यांना जेवण, पाणी याबाबत देखील व्यवस्था करण्यात आली आहे.





