मुंबई : भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे मागील काही दिवसांपासून राज्य सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यातच आता त्यांच्या रडारवर महाविकास आघाडीमधील दोन नेते आले आहेत. हसन मुश्रिफ आणि अनिल परब यांना सोमय्या यांनी लक्ष्य केले आहे. दरम्यान, कारवाई झालेल्या मंत्र्यांमध्ये आता या दोन मंत्र्यांचा क्रमांक लागणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.
हसन मुश्रीफ यांच्याविषयी बोलताना सोमय्या म्हणाले,”मुश्रीफ यांनी शेल कंपन्यांमध्ये पैसा गुंतवला असून त्यांनी मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. “न्यायालयाकडून या प्रकरणाच्या तपास करण्याचा आदेश दिला जाणार आहे. त्यांच्या कारनाम्यांवर आजपासून कारवाईला सुरुवात होणार”, असे म्हटले आहे. न्यायालयामध्ये सरकारने याचिका दाखल केल्याचाही दावाही सोमय्यांनी केला आहे.
GOI action against Mushrif Family Fraud
Govt of India filed Complaint Petition at Pune Court against Hasan Mushrif Family & Senapati Ghorpade Karkhana. Actions requested under Sec 447 & 439 Companies Act & Investigation IPC/CRPC Sec 256 for Fraud, Shell Cos
Hearing in few days pic.twitter.com/KX6qVdRlHG
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) April 1, 2022
मुश्रीफ आणि परब यांनी केलेल्या घोटाळ्यांसंदर्भात आपण भारत सरकारकडे तक्रार केल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच केंद्र सरकारने ही तक्रार स्वीकारली असून आजपासून यासंदर्भात घडामोडी सुरु होतील असे वक्तव्य सोमय्या यांनी केले आहे. हा एकूण १५८ कोटींचा घोटाळा असून यामध्ये ईडी, कंपनी मंत्रालय, प्राप्तीकर विभागाकडून कारवाई केली जाईल, अशी शक्यताही सोमय्यांनी व्यक्त केली आहे.
अनिल परबांवर निशाणा साधताना सोमय्यांनी, “ते मागील सहा महिन्यापासून रोज बोलतात की माझा रिसाॅर्टशी संबंध नाही. परबांनो मोदी सरकारनेच याचिका दाखल केलीये. तुम्ही या याचिकेत गुन्हेगार आहात. भारत सरकारची याचिका आहे, न्यायालयाने दखल घेतली आहे. १६ एप्रिलला सुनावणी आहे,” असे म्हटले आहे. “परब यांनी खरमाटे आणि सचिन वाझेंकडून पैसे घेतले आणि रिसाॅर्ट बांधला, कोव्हीडच्या नावाखाली, लाॅकडाऊन केला आणि घोटाळा केला, परबांनो बॅग भरा तयारी करा,” असेही सोमय्या म्हणाले आहेत.