भिगवण / लोणी काळभोर -मध्यप्रदेशमधील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळवून आणून, तिचे शारिरीक शोषण केले. ती गरोदर राहिल्यामुळे तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी दोन परप्रांतीय तरुणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे.
राकेश सूरज साहू (वय 24), अनिल संतलाल साहु (वय 19, दोघेही रा. नगुरदेवा, रामपूर, जि. सिद्धी, मध्यप्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत. भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 मार्च रोजी सकाळी 14 वर्षाची एक अनोळखी मुलगी बेशुद्धावस्थेत आढळली होती. तिच्या गळ्यावर वार केलेले होते, डोक्यात दगडाने गंभीर जखम झाली होती.
तिची ओळख पटली नसली तरी तिच्याकडून संशयिताचा मोबाईल नंबर प्राप्त झाला होता. त्यानुसार राकेश सूरज साहू याचे जखमी मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ती गर्भवती राहिली होती; परंतु मूळ गावी पोलीस तक्रार दाखल झाल्याचे समजल्यामुळे अनिल साहु याने राकेश साहु याच्याशी संगनमत करून जखमी मुलीस जिवे ठार मारण्याचा कट केला.
तिला भिगवण येथील मक्याचे रानात नेऊन ब्लेडने वार केले व डोक्यात दगड मारून, गळा आवळून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला. परंतु जखमी मुलगी ही बेशुद्ध पडल्याने अनिल साहू याने ती मृत झाल्याचे समजून तेथून पळ काढला होता. जखमी मुलीवर अद्याप ससून हॉस्पीटल, पुणे येथे उपचार सुरू आहेत.