संयोजन समितीतील दोघांना करोनाची बाधा

टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीला फटका

टोकियो – जपानमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेवरील दुष्टचक्र थांबण्याची चिन्हे काही दिसत नाहीत. या स्पर्धेच्या संयोजन समितीतील दोन सदस्यांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे स्पर्धेच्या तयारीलाही फटका बसला आहे.

शनिवारी समितीतील एका सदस्याला करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य दोन जणांनाही बाधा झाल्याचे जपान ऑलिम्पिक संघटनेने सांगितले आहे. या दोन सदस्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी किती जणांना ही बाधा झाली आहे याबाबत सध्या समितीतील सर्वच सदस्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे.

या चाचणीचा अहवाल आल्यावरच याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, यामुळे देशात पुन्हा ऑलिम्म्पिक तयारीच्या कामाला आलेला वेग मंदावणार आहे. मुळातच ही स्पर्धा गेल्या जुलैपासून पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार सुरू होणार होती. मात्र, करोनाचा धोका वाढल्याने ही स्पर्धा एक वर्षाने पुढे ढकलण्यात आली. आता या मिळालेल्या जादा वेळेत स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने सुरू असलेली कामे पूर्ण करण्याची आयती संधी संयोजकांना मिळाली होती. मात्र, त्यातच दोन सदस्यांना करोनाची बाधा झाल्याने या तयारीलाही फटका बसला आहे.
करोनाचा धोका वाढल्याने समितीने आपल्या सदस्यांना कार्यालयात येण्यापासून रोखले होते. गेल्या महिन्यापासून जपानमध्ये हा धोका कमी झाल्याने तयारीच्या कामांना पुन्हा वेग आला होता. आता येत्या काळात ही तयारी सुरू कशी ठेवायची व सदस्य तसेच कर्मचारीवर्गाला करोनापासून लांब कसे ठेवायचे, असा प्रश्‍न संघटनेला
पडलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.