महापौर पदासाठी दोन ‘माई’ रिंगणात

भाजपकडून माई ढोरे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माई काटे यांचे अर्ज दाखल

पिंपरी – शहराच्या महापौर पदासाठी दोन “माई’ रिंगणात दाखल झाल्या आहेत. महापालिकेत महापौर व उपमहापौर पदासाठी भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी आज नगरसचिव कार्यालयात स्वतंत्र अर्ज दाखल केले. भाजपकडून महापौर पदासाठी ज्येष्ठ नगरसेविका उषा (माई) ढोरे यांना तर, पिंपरी मतदारसंघातून उपमहापौर पदासाठी तुषार हिंगे यांना संधी देऊ केली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून स्वाती (माई) काटे व राजू बनसोडे यांनी अनुक्रमे महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज भरून भाजपला आव्हान निर्माण केले आहे. भाजपमधील नगरसेवक फुटणार नाहीत, असा भाजपचा दावा आहे. तर, भाजपला महापौर पदाच्या निवडणुकीत अडचणीत आणण्याची रणनीती राष्ट्रवादीने आखली आहे.

महापौर व उपमहापौर पदासाठी आज दुपारी 3 ते 5 या वेळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुदत दिली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सुरुवातीला माई काटे आणि राजू बनसोडे यांनी नगरसचिव कार्यालयात अर्ज दाखल केले. त्यांच्या समवेत शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मयूर कलाटे, नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा धर आदी उपस्थित होते. भाजपकडून सायंकाळी पाच वाजताच्या पूर्वी माई ढोरे आणि तुषार हिंगे यांन अर्ज दाखल केला. आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, महापौर राहुल जाधव, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

बंडखोरी रोखण्यावर भर
भाजपकडून महापौर पदासाठी 21 नगरसेविकांतून ज्येष्ठता, काम करण्याचा अनुभव आदी प्रमुख निकषांवर माई ढोरे यांची निवड करण्यात आली. तसेच, यापूर्वी भोसरी मतदारसंघाला नितीन काळजे आणि राहुल जाधव यांना महापौर पदासाठी संधी देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता चिंचवड मतदारसंघाला संधी देत माई ढोरे यांचे नाव कोअर कमिटीने निश्‍चित केले. त्याच वेळी पिंपरीतून उपमहापौर पदासाठी तुषार हिंगे यांना संधी देण्यात आली.

भाजपमध्ये महापौर पदासाठी बंडखोरी होऊ नये यासाठी शेवटचे दहा मिनिटे राहिले असताना अर्ज भरण्यात आला. उपमहापौर पदासाठी शीतल शिंदे यांचे नाव अंतिम क्षणापर्यंत चर्चेत होते. मात्र, आयत्या वेळी तुषार हिंगे यांना संधी देण्यात आली. शीतल शिंदे यांनी मात्र हा दावा फेटाळला. “”उपमहापौर पदासाठी माझे नाव चर्चेत होते, याबाबत मला कल्पना नाही. माझ्या पायाला दुखापत झाल्याने मी आलो नाही,” असे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आव्हान
भाजपला महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध जिंकू द्यायची नाही, असा निर्धारच राष्ट्रवादी कॉंग्रेसने केल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी सध्या महाशिवआघाडीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपला महापौर पद मिळण्यापासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून फोडाफोडाची रणनीती आखली जात आहे. महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस – 36, शिवसेना – 9, मनसे – 1 आणि अपक्ष – 5 एकत्र आल्यास 51 जणांचे संख्याबळ होते. महापौर पदासाठी 65 मतांची गरज आहे. भाजपची 14 मते मिळाली तरी पिंपरी महापालिकेत भाजपला महापौर पद मिळण्यापासून राष्ट्रवादीला रोखता येणार आहे. भाजपचे 77 नगरसेवक आहेत. त्याशिवाय, 5 अपक्ष नगरसेवकांनीही भाजपला पाठिंबा देऊ केला आहे. त्यामुळे भाजपकडे 82 मते आहेत. ती मते फुटणार नसल्याची भाजपला खात्री आहे. त्यामुळे महापालिकेत भाजपचाच महापौर होईल, असा भाजप पदाधिकाऱ्यांचा दावा आहे.

शुक्रवारी होणार निवडणूक
महापौर व उपमहापौर पदासाठी येत्या शुक्रवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता विशेष सभेत निवडणूक होणार आहे. महापालिका मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही निवडणूक होईल. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनु गोयल हे कामकाज पाहणार आहेत.

महापौर पदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा विरोधकांचा दावा ही अफवा आहे. उलट राष्ट्रवादीचेच 25 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. महापालिकेत सर्व पक्ष विरूद्ध आम्ही असलो तरीही आम्हाला कोणाचेही आव्हान नाही. महापौर आणि उपमहापौर पदाच्या बिनविरोध निवडीसाठीच आम्ही पुढील दोन-तीन दिवसांत प्रयत्न करणार आहोत.
– लक्ष्मण जगताप, आमदार व शहराध्यक्ष, भाजप


महापौर आणि उपमहापौर पदासाठी आम्ही आज भरलेले अर्ज कायम ठेवणार आहोत. भाजपच्या 16-17 नगरसेवकांची मते फोडण्याचे आमचे नियोजन आहे. भाजपचे महापौर व उपमहापौर आम्ही बिनविरोध होऊ देणार नाही.
– नाना काटे, विरोधी पक्षनेता, महापालिका

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)