सातारा जिल्ह्यातील दोन लाख नागरिक लसीच्या प्रतिक्षेत

लसींच्या आढाव्यासाठी केंद्रीय समिती साताऱ्यात

सातारा – सातारा जिल्ह्यात धुमधडाक्‍यात सुरू झालेली कोविड लसीकरण मोहीम 37 दिवसांनी थंडावली आहे. तब्बल साठ हजार लसींचा कोटा गेल्या तीन दिवसांत संपल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेला लसीकरण मोहिमेतून सक्तीचा ब्रेक घ्यावा लागला आहे. जिल्ह्यातील तब्बल दोन लाख 72 हजार नागरिक लसीच्या दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, लसींची मागणी व पुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय समिती साताऱ्यात दाखल झाली आहे.

जिल्ह्यातील लसींचा साठा संपल्याने लसीकरणाची मोहीम थांबवण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. जिल्हा रुग्णालयासह जम्बो कोविड सेंटरला दररोज सरासरी 800 लसींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. गरजेप्रमाणे प्रतिदिन हजार ते बाराशे डोस जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून उपलब्ध होत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली; परंतु साठा संपल्याने लसीकरण थांबविण्यात आल्याचे ते म्हणाले. लस उपलब्ध होईपर्यंत जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्वच केंद्रांवर लसीकरण होऊ शकणार नाही, असे प्रशासनाने गुरुवारी जाहीर केले.

जिल्ह्यात 1 मार्चपासून तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात डॉक्‍टर व आरोग्य विभागातील कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात संरक्षण दले, सरकारी कर्मचारी आणि तर तिसऱ्या टप्प्यात 45 वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. त्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. जिल्ह्यात 72 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 326 उपकेंद्रांवर लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यासाठी तीन दिवसांपूर्वी लसीचे 60 हजार डोस उपलब्ध झाले होते. प्रशासनाने रोज 20 हजारांहून अधिक नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले होते. नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे; परंतु लसींचा साठा संपला असल्याने मोहिमेला काहीशी खीळ बसली आहे.

रम्यान, केंद्र सरकारची पाच सदस्यांची समिती राज्यातील 20 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आली असून, या समितीने गुरुवारी साताऱ्यात भेट दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी समितीला लसीकरण मोहिमेबाबत माहिती दिली. लसींची मागणी व पुरवठ्याचा तपशीलही समितीला देण्यात आला. येत्या काही दिवसांत केंद्राकडून महाराष्ट्राला साडेसात लाख डोस पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

लसीच्या दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा
जिल्ह्यात आजअखेर दोन लाख 72 हजार 17 नागरिकांनी लस घेतली आहे. यातील दोन लाख 22 हजार 796 नागरिकांनी पहिला डोस, तर 33 हजार 638 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. सध्या लसींचा तुटवडा असल्याने दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस प्रलंबित आहे.

लसीचा साठा संपल्याने जिल्ह्यात लसीकरण थांबण्यात आले आहे. राज्य शासनाकडे मागणी केली असून, लस उपलब्ध झाल्यानंतर मोहीम पुन्हा सुरू केली जाणार आहे.
– विनय गौडा,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.