सातारा – मुंबई महापालिकेत नोकरी लावतो असे सांगून दीपक बाळासाहेब साळुंखे यह युवकाची दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद त्याचे वडील बाळासाहेब गेणू साळुंखे (रा. करंजे, सातारा, मूळ रा. अंबवडे, ता. कोरेगाव) यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुलदीप तुकाराम काळे (रा. खारघर, मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळासाहेब साळुंखे यांचा मुलगा दीपक यास मुंबई महापालिकेत नोकरीस लावतो, असे सांगून संशयिताने दोन लाख रुपये मागितले होते.
त्यामुळे बाळासाहेब साळुंखे यांनी दि. 1 डिसेंबर 2015 रोजी प्रतापगंज पेठेतील स्टेट बॅंकेच्या शाखेतून कुलदीप काळे याच्या मुंबई येथील बॅंक खात्यात दोन लाख रुपये एनईएफटीद्वारे पैसे पाठविले होते. मात्र, पैसे पाठवूनही नोकरीसाठी बोलावण्यात आले नाही, तसेच पैसेही परत मिळाले नाही. त्यामुळे काळे याने फसवणूक केल्याचे साळुंखे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी फिर्याद नोंदवली. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे तपास करत आहेत.