सुनील राऊत
पुणे – शहरात ऑगस्टअखेर करोनाग्रस्तांचा एकूण आकडा तब्बल 2 लाखांचा टप्पा पार करणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात जवळपास 91 हजार सक्रिय बाधित असतील. त्यांच्यावर उपचारांसाठी महापालिकेस नियमित बेड, ऑक्सिजन बेड, आयसीयू तसेच व्हेंटिलेटर्सची सुविधा असलेले तब्बल 79 हजार बेड तयार ठेवावे लागणार आहेत.
महापालिका आरोग्य विभाग आणि स्मार्ट सिटीने दि.11 ते 21 जुलै या दहा दिवसांच्या कालावधीत शहरात वाढलेल्या करोनाबाधित तसेच रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीच्या आकडेवारीवरून ही प्रस्तावित संख्या समोर आणली आहे. दरम्यान, या पद्धतीच्या निष्कर्षानुसार 31 जुलैअखेर शहरात एकूण 53 हजार करोनाबाधित असतील, असा अंदाज पालिकेने वर्तवला होता. सध्या शहरात एकूण 45 हजार बाधित आहेत. त्यामुळे सध्याचा रुग्णवाढीचा आकडा पाहता पालिकेचा अंदाज तंतोतंत खरा ठरण्याची शक्यता आहे.
सध्या शहरात करोनाचे दररोज 1,500 ते 1,800 नवे बाधित आढळत आहेत. या वाढीच्या आधारावर स्मार्ट सिटीने केलेल्या विश्लेषणानुसार, शहरात जुलैअखेर 60, 328 बाधित असतील. तर हा आकडा 15 ऑगस्टपर्यंत 1 लाख 8 हजार 589 पर्यंत जाईल. तर 31 ऑगस्टअखेर हा आकडा 2 लाख 3 हजार 270 पर्यंत जाईल. त्यात सक्रिय बाधितांची संख्या 91 हजार 471 असण्याचा अंदाज आहे.